भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेल्या सीमासंघर्षावर आता कूटनीतीच्या माध्यमातून  तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत.  आज  डब्ल्यूएमसीसीची एक महत्वपूर्ण बैठक होणार आहे. पूर्व लडाखमध्ये चार ठिकाणी संघर्षाची स्थिती आहे, त्यातून कसा तोडगा काढायचा या विषयी बैठकीत चर्चा होईल.

२२ जून रोजी भारत आणि चिनी लष्कराच्या अधिकाऱ्यांमध्ये वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली. यामध्ये सैन्य मागे घेण्यासंदर्भात दोन्ही बाजूंमध्ये एकमत झाल्याचे अनौपचारिकरित्या सांगण्यात आले. पण त्या बैठकीत नेमकं काय ठरलंय ते अजून स्पष्ट झालेलं नाही. चीनच्या प्रवक्त्याने नेहमीप्रमाणे सीमेवर परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

लष्करी अधिकाऱ्यांमध्ये प्रत्येक वादाच्या मुद्दावर चर्चा झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी तणाव कमी करायचे ठरवले आहे. या संपूर्ण प्रक्रियेला काही आठवडयांचा कालावधी लागू शकतो. कारण ठरल्यानुसार प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सर्व घडतेय कि, नाही हे कमांडर्सना पाहावे लागेल असे एका वरिष्ठ लष्करी कमांडरने सांगितले.

आता संयुक्त सचिव स्तरावरील WMCC लष्करी चर्चा पुढे नेईल. भारतीय अधिकारी नकाशे, जुन्या कराराच्या कागदपत्रांच्या आधारे चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचा भारतीय प्रदेशांवरील दावा कसा चुकीचा आहे, ते पटवून देण्याचा प्रयत्न करतील. एप्रिलच्या मध्यामध्ये जी स्थिती होती, तशीच ‘जैसे थे’ स्थिती कायम करण्याचा भारताचा प्रयत्न आहे.