राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील संघटनांच्या येथे सुरू असलेल्या बैठकीत रविवारी भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी जम्मू- काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेण्यात आल्याबद्दल सविस्तर माहिती दिली; तर पक्षाचे ज्येष्ठ नेते राम माधव यांनी आसाममध्ये राष्ट्रीय नागरिक नोंदणीच्या (एनआरसी) मुद्दय़ाबाबतच्या चिंतांना उत्तर दिले, अशी माहिती सूत्रांनी दिली.

भाजपची मातृसंस्था असलेला संघ आणि त्याच्या सहयोगी संघटना यांनी अनुच्छेद ३७० मधील जम्मू- काश्मीरबाबतच्या तरतुदी रद्द केल्याबद्दल सरकारचे कौतुक केले. काश्मीर खोऱ्यातील सर्वसाधारण परिस्थिती सुधारण्यासाठी सरकारच्या विविध योजनांची नड्डा यांनी विस्तृत माहिती दिली, असेही सूत्रांनी सांगितले.

राम माधव यांनी आसाममधील एनआरसीच्या मुद्दय़ाबाबत प्रतिनिधींना माहिती दिली, तसेच अनेक मूळ लोक अंतिम यादीतून वंचित राहिल्याबद्दल बैठकीत विचारण्यात आलेल्या चिंतायुक्त प्रश्नांना उत्तरे दिली.

आसाममध्ये राष्ट्रीय नागरिक नोंदणीमध्ये वगळल्या गेलेल्यांपैकी बहुतांश लोक हिंदू असल्याचा संघ संघटनांच्या प्रतिनिधींचा दावा होता. ३१ ऑगस्टला प्रसिद्ध करण्यात आलेल्या आसाममधील एनआरसीच्या अंतिम यादीतून १९ लाख लोक बाहेर राहिले असल्याबाबत संघ परिवारातील ‘सीमा जागरण मंचा’ने शनिवारी त्यांच्या सादरीकरणादरम्यान चिंता व्यक्त केली होती.

देशातील लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच होणाऱ्या या समन्वय बैठकीत संघ परिवारातील ३५ संघटनांचे दोनशेहून अधिक प्रतिनिधी सहभागी झाले आहेत, अशी माहिती आयोजकांनी दिली.