शस्त्रसंधीचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर देण्याचे आदेश संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी सुरक्षा दिलेले असतानाच पाकच्या कुरापतींनाही जोर आला आहे. जम्मू-काश्मिरातील सांबा आणि कथुआ या क्षेत्रांत पाकिस्तानी लष्कराने शनिवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत भारतीय ठाण्यांवर तुफान गोळीबार केला. त्यात दोन जवान शहीद झाले, तर एक महिला मृत्युमुखी पडली. भारतानेही पाकच्या या कुरापतीला चोख प्रत्युत्तर दिले.
पाकिस्तानी लष्कराने आंतरराष्ट्रीय सीमारेषेनजीकच्या भारतीय हद्दीतील १३ गावांवर शुक्रवार रात्रीपासून गोळीबार करत तोफगोळे डागले. शनिवार सकाळपर्यंत हा मारा चालू होता. त्यात  दोन जवान शहीद झाले, तर तोरी देवी या महिलेचा मृत्यू झाला. ११ जण या गोळीबारात जखमी
झाले.  पाकिस्तानच्या गोळीबारानंतर सीमा सुरक्षा दलांनी सांबा आणि कथुआ जिल्ह्य़ातील सुमारे १४०० ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलवले. दरम्यान, सीमा सुरक्षा दलांनीही पाकिस्तानच्या या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर दिले.

‘पाकिस्तानचा आरोप म्हणजे विश्वासभंग’
पाकिस्तान रेंजर्सला भारतीय सुरक्षा दलांनी ठार केल्याबाबत पाकिस्तानचा आरोप म्हणजे विश्वासभंग आहे, अशी तिखट प्रतिक्रिया भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी व्यक्त केली आहे. पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय सीमा व प्रत्यक्ष ताबा रेषेवर शांतता राखण्यासाठी लागू असलेल्या नियम यंत्रणेचा भंग करू नये, असेही त्यांनी पाकिस्तानचे सुरक्षा सल्लागार सरताज अझीज यांना लिहिले आहे.