दिल्लीत टोळक्याच्या सक्तीने मराठी डॉक्टर हबकला

पुण्यातील नामंवत स्त्रीरोगतज्ज्ञ आणि ‘साथी’ या आरोग्य क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सामाजिक संस्थेचे समन्वयक डॉ. अरुण गद्रे यांना रविवारी दिल्लीत अत्यंत धक्कादायक घटनेला सामोरे जावे लागले.

कनॉट प्लेस या मध्यवर्ती भागात सकाळी फेरफटका मारायला निघालेल्या डॉ. गद्रे यांना सहा जणांच्या टोळक्याने अडवून ते कोणत्या धर्माचे आहेत, याची विचारणा केली आणि ‘जय श्रीराम’ म्हणण्याची सक्ती केली. डॉ. गद्रे यांनी ‘जय श्रीराम’ म्हणताच टोळक्याने त्यांना सोडून दिले. अचानक ओढवलेल्या या प्रसंगामुळे डॉ. गद्रे विचलित झाले होते. डॉ. प्रकाश आमटे यांच्याबरोबर सामाजिक कार्यात सहभागी झालेले डॉ. गद्रे यांचे उत्तर प्रदेशमधील बिजनौर येथे व्याख्यान होते.

इंडियन मेडिकल असोसिएशनने आयोजित केलेल्या या व्याख्यानासाठी डॉ. गद्रे शनिवारी रात्री जंतरमंतरनजीक असणाऱ्या ‘वायएमसीए’ हॉस्टेलमध्ये उतरले होते. रविवारी सकाळी साडेसात वाजता ते बिजनौरला रवाना होणार असल्यामुळे दररोजच्या सवयीप्रमाणे ते सहा वाजता फेरफटका मारायला निघाले होते. ते जंतरमंतरनजिक असलेल्या कनॉट प्लेसच्या हनुमान मंदिराजवळ पोहोचले असता पाच-सहा जणांच्या टोळक्याने त्यांना अडवले आणि त्यांचा धर्म विचारला. त्यांना ‘जय श्रीराम’ म्हणण्याची सक्ती केली. डॉ. गद्रे यांनी ‘जय श्रीराम’ म्हणूनही या टोळक्याचे समाधान झाले नाही.

त्यांनी मोठय़ा आवाजात पुन्हा ‘जय श्रीराम’ म्हणण्यास सांगितले, पण डॉ. गद्रे तिथून निघून गेले.

या टोळक्याने मला कोणतीही शारीरिक इजा पोहोचवली नाही. पाच-सहा जणांनी अचानक घेरल्यामुळे थोडा विचलित झालो होतो. पण, हा प्रसंग क्षुल्लक असून त्यावरून कोणीही कुठलाही निष्कर्ष काढू नये, असे डॉ. अरुण गद्रे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.