एखाद्या माणसाच्या पोटात स्टिलचा ग्लास होता असे सांगितले तर तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल. पण ही घटना खरोखर घडली आहे. कानपूर येथील डॉक्टरांनी रूग्णाच्या पोटातून स्टिलचा ग्लास बाहेर काढला आहे. उत्तरप्रदेशातील कानपूरमधल्या रामा रूग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यात आली. रामदिन असे या रूग्णाचे नाव आहे. अयुरिया जिल्ह्यातील दिबीयापूर येथे राहणाऱ्या रामदिनला पोटदुखीचा त्रास जाणवू लागला.

तो जेव्हा रूग्णालयात आला तेव्हा त्याला तपासण्यात आले, तसेच त्याचा एक्स रेही काढण्यात आला. सर्जन दिनेश कुमार यांनी त्याला अनेक प्रकारच्या चाचण्या करण्यास सांगितले. एक्स रे तपासणीत त्याच्या पोटात ग्लास असल्याचे समोर आले. त्यानंतर शस्त्रक्रिया करून हा स्टिलचा ग्लास बाहेर काढण्यात आला. हा स्टिलचा ग्लास त्याच्या पोटात कसा गेला हे डॉक्टरांनी रामदिनला विचारले तेव्हा धक्कादायक वास्तव समोर आले.

रामदिन ने दिलेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी रामदिनने त्याची बाईक विकली. या बाईकच्या मोबदल्यात त्याला ५० हजार रुपये मिळाले. हे पैसे लुटण्यासाठी काही गुंडांनी त्याच्यावर हल्ला केला. तसेच त्याला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली. बेशुद्ध झाल्यानंतर रामदिनच्या गुदद्वारात गुंडांनी स्टिलचा ग्लास घुसवला. तो ग्लास रामदिनच्या पोटात गेला. या घटनेनंतर त्याला पोटदुखीचा प्रचंड त्रास जाणवू लागला. रामदिन रूग्णालयात पोहचला तेव्हा एक्स रेमध्ये त्याच्या पोटात ग्लास असल्याचे समजले अशी माहिती सीनियर सर्जन डॉक्टर दिनेश कुमार यांनी दिली. टाइम्स ऑफ इंडियाने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

रूग्णालयातील ४ सर्जन्सनी मिळून रामदिनची शस्त्रक्रिया केली आणि त्याच्या पोटातील ग्लास बाहेर काढला. ही शस्त्रक्रिया एक तास सुरू होती. बऱ्याचदा काही छोट्या वस्तू पोटात गेल्याच्या घटना घडतात. मात्र स्टिलचा ग्लास एखाद्या व्यक्तीच्या पोटात अडकला अशा प्रकारची ही पहिलीच घटना आहे असे डॉक्टरांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर रामदिनला बेशुद्ध करताना काही औषधांचा वापर झाला होता त्यावरून एखाद्या मेडिकलशी संबंधित लोक त्याच्या मारहाण आणि लूट प्रकरणात जोडले गेले असावेत असा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला.