भारत हा सर्वाधिक आयात कर लादणारा देश आहे, अशी टीका अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली असून अमेरिकेत येणाऱ्या भारतीय वस्तूंवरही तसाच जास्तीचा आयात कर लागू करण्याचा विचार करीत आहोत असा इशारा दिला आहे. भारतीय वस्तूंवर आम्ही जशास तसे न्यायाने १०० टक्के कर लादणार नाही, पण निदान २५ टक्के कर लागू करू असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या प्रस्तावाला सिनेटमध्ये विरोध आहे, त्यामुळे त्यांनी समर्थकांना पाठिंब्यासाठी आवाहन केले.

मेरीलँड या वॉशिंग्टनच्या उपनगरात आयोजित कॉन्झर्वेटिव्ह पॉलिटिकल अ‍ॅक्शन कॉन्फरन्समध्ये त्यांनी सांगितले, की भारत हा जास्त आयात कर लादणारा देश आहे. ते आमच्या वस्तूंवर खूप कर लावतात. ट्रम्प यांचे आयात करावरून चीनशीही व्यापार युद्ध सुरू असून त्यांनी तूर्त समेटाची भूमिका घेतली आहे, पण वाटाघाटी फिसकटल्या तर चिनी वस्तूंवरही अमेरिका जास्त आयात कर आकारणार आहे.

ट्रम्प यांनी त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठय़ा दोन  तासांच्या भाषणात त्यांच्या राजकीय विरोधकांवर सडकून टीका केली. जागतिक प्रश्न, द्विपक्षीय संबंध, देशांतर्गत मुद्दे या  सर्व बाबींना त्यांनी स्पर्श केला. हार्ले डेव्हिडसन मोटरसायकलचे उदाहरण देऊन त्यांनी सांगितले, की आमच्या या मोटारसायकली भारतात पाठवल्या जातात तेव्हा त्यावर शंभर टक्के कर लादला जातो. भारत जेव्हा त्यांच्या मोटारसायकली आमच्या देशात पाठवतो तेव्हा आम्ही त्यावर काहीच कर लावत नाही. त्यामुळे भारताच्या वस्तूंवर किमान काही तरी कर लादणार आहोत.

यापूर्वी त्यांनी व्हाइट हाऊसमधील एका कार्यक्रमात २४ जानेवारीला असे सांगितले होते,की भारताने हार्ले डेव्हिडसन मोटरसायकलींवरील कर १०० टक्क्य़ांवरून ५० टक्के केला आहे, त्यामुळे आपण समाधानी आहोत. आमच्या मोटरसायकलवरचा कर पन्नास टक्के कमी करण्यात यश आले आहे. पण तरी अमेरिकी मोटरसायकलवर ५० टक्के कर व भारतीय मोटरसायकलवर २.४ टक्के कर अशी परिस्थिती अजून कायम आहे. खरेतर भारतीय वस्तूंवर शंभर टक्के कर लादायला हवा, २५टक्के कर लावतो म्हटले तर लोक मूर्खात काढतील, पण तरी भारतीय वस्तूंवर २५ टक्के कर लावण्याचा विचार आहे. त्यासाठी राजकीय पाठिंबा मिळावा, असे ट्रम्प म्हणाले.