वॉशिंग्टन : वैधरीत्या आलेले स्थलांतरित अमेरिकेच्या प्रगतीत मोठा हातभारच लावत असतात, असे सांगून अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘स्टेट ऑफ युनियन’ अर्थात पारंपरिक अध्यक्षीय भाषणात गुणवान स्थलांतरितांची जोरदार पाठराखण केली. यामुळे सध्या देशनिहाय कोटा पद्धतीचा सर्वाधिक फटका बसलेल्या येथील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील हजारो भारतीयांच्या आशा उंचावल्या आहेत.

ग्रीन कार्ड किंवा कायम वैध वास्तव्याचा परवाना देण्यात प्रत्येक देशासाठी सात टक्के जागा राखून ठेवण्याची पद्धत ट्रम्प प्रशासनाने लागू केली असून, बहुतांशी अत्यंत कुशल असलेले आणि प्रामुख्याने एच-१ बी व्हिसावर अमेरिकेत आलेले भारतीय अमेरिकी लोक या पद्धतीचे सगळ्यात मोठी शिकार ठरले आहेत.

‘‘आमच्या नागरिकांचे जीवनमान आणि नोकऱ्यांचा हक्क अबाधित राखणाऱ्या स्थलांतरणाला वाव देणे, हे आमचे नैतिक कर्तव्य आहे,’’ असे ट्रम्प म्हणाले.

अमेरिकेचा वैध रहिवासी किंवा नागरिक असलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्याला ‘स्पॉन्सरशिप’द्वारे अमेरिकेत जलद आणि सहज प्रवेश घेता येत असे. हे साखळी स्थलांतरण थांबवण्याचे सूतोवाच ट्रम्प यांनी केले आहे.