भारत व चीन यांच्यामुळेच अमेरिकेने हवामान करारातून माघार घेतली, असा आरोप अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. गेल्या वर्षी अमेरिकेने पॅरिस हवामान करारातून माघार घेतली हे खरे आहे, पण त्यासाठी भारत आणि चीन जबाबदार आहेत. कारण तो करार अन्यायकारक होता. त्यात आम्हाला भारत व चीन यांना पैसे द्यावे लागले असते, असे ट्रम्प यांचे म्हणणे आहे.

ट्रम्प यांनी गेल्या वर्षी जून महिन्यात पॅरिस हवामान करारातून माघार घेतली होती. तेव्हा त्यात त्यांनी या करारामुळे अमेरिकेला लाखो डॉलर्सचा फटका बसला असता, अनेक नोकऱ्यांच्या संधी गेल्या असत्या, तेल, वायू व कोळसा तसेच उत्पादन उद्योगांना फटका बसला असता अशी कारणे दिली होती.

आम्ही पॅरिस करारातून बाहेर पडलो, अन्यथा ती मोठी शोकांतिका ठरली असती. देशासाठी तो करार घातक होता, असे ट्रम्प यांनी राजकीय कृती समितीसमोर शनिवारी सांगितले. चीन व भारत यांना पॅरिस करारातून फायदा मिळण्याची शक्यता होती असे सांगून ते म्हणाले की, हवामान बदलाचा हा करार अमेरिकेसाठी अन्यायकारक होता, त्यामुळे अमेरिकेतील उद्योग व नोकऱ्या धोक्यात आल्या असत्या. करारातून माघारीचे समर्थन करताना त्यांनी सांगितले की, आमच्याकडे तेल व नैसर्गिक वायू मोठय़ा प्रमाणात आहे. त्यासाठी लागणारे तंत्रज्ञान आहे. ऊर्जेचे मोठे साठे आहेत, कोळसा आहे. या करारात हे सगळे तुम्ही वापरू नका असे सांगितले गेले. याला स्पर्धात्मकता म्हणत नाहीत. त्यामुळे मी करारातून माघार घेतली. चीनसाठी हा करार २०३० पर्यंत अमलात येणार नाही. रशिया तर मागे जाऊन १९९० च्या काळात आहे. त्याला काही स्वच्छ पर्यावरणाचा विचार म्हणता येणार नाही. या करारामुळे भारत व इतर मोठय़ा देशांना आम्हाला पैसे द्यावे लागले असते. कारण ते स्वत:ला विकसनशील देश समजतात. ठीक आहे ते विकसनशील देश आहेत, मग आम्ही कोण आहोत. आम्ही विकास करायचा की नाही. भारत विकसनशील देश आहे, चीन विकसनशील देश आहे व आम्ही विकसित आहोत म्हणून आम्ही  त्यांच्यासाठी खर्च करायचा हे मला मान्य नाही.