महात्मा गांधींच्या नावाने चुकीच्या उद्गाराचा प्रचारात वापर
महात्मा गांधी यांचे चुकीचे वाक्य उद्धृत केल्याने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतले रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. उद्योगपती ट्रम्प यांनी जे वाक्य महात्मा गांधी यांच्या नावाने आपल्या प्रचारासाठी सोशल मीडियावर टाकले आहे, त्यामुळे त्यांना अमेरिकेतील प्रसारमाध्यमांनी चांगलेच कोंडीत पकडले आहे. मात्र आपण चुकीचे वाक्य वापरल्याबद्दल उठलेल्या गदारोळावर ट्रम्प यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त झालेली नाही.
‘त्यांनी प्रथम तुमच्याकडे दुर्लक्ष केले. नंतर ते तुम्हाला हसले, नंतर ते तुमच्याशी लढले आणि तुम्ही जिंकलात -महात्मा गांधी’ असे वाक्य ट्रम्प यांनी काल इन्स्टाग्राम या सोशल साइटवर आपल्या प्रचारामध्ये टाकले होते. या पोस्टवर त्यांनी अल्बामा येथे ट्रम्प समर्थकांनी घेतलेल्या मेळाव्याचे छायाचित्रही प्रसिद्ध करण्यात आले आहे. या प्रकारानंतर ट्रम्पविरोधकांनी जोरदार आघाडी उघडून त्यांना अडचणीत आणले आहे. ‘हिल’ या अमेरिकेतील राजकीय प्रसार माध्यमाने म्हटले आहे की, गांधीजींनी असे वाक्य कधी उच्चारले असल्याची कोणतीही नोंद उपलब्ध नाही. मात्र १९१८मध्ये समाजवादी नेते निकोलस क्लेन यांनी एका युनियनच्या सभेत बोलताना हे वाक्य उच्चारल्याची नोंद आहे, असेही ‘हिल’ने म्हटले आहे.
ट्रम्प यांनी यापूर्वीही इटलीचा हुकूमशहा बेनेटो मुसोलिनी याचे वाक्य प्रचारासाठी वापरून गोंधळ उडविला होताच, त्यात आता आणखी एका चुकीच्या संदर्भाची भर पडली असल्याची टीका प्रसार माध्यमांतून करण्यात येत आहे.