जम्मू-काश्मीरवरून भारत आणि पाकिस्तानदरम्यान असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनद्वारे चर्चा केली. जवळपास अर्धातास झालेल्या या संवादात द्विपक्षीय संबंधांपासून प्रादेशिक विषयांपर्यंत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. मोदींशी झालेल्या चर्चेनंतर ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याशीही फोनद्वारे संवाद साधला.  डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही नेत्यांसोबत झालेल्या चर्चेबाबत माहिती दिली आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान या माझ्या दोन चांगल्या मित्रांशी आज फोनद्वारे चर्चा झाली. काश्मीरमधील परिस्थिती कठीण आहे पण दोघांशी उत्तम चर्चा झाली, असं ट्रम्प हे दोन्ही नेत्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर म्हणाले. ट्विटरद्वारे  दोन्ही नेत्यांशी झालेल्या चर्चेबाबत माहिती देताना, ” पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान खान या माझ्या दोन चांगल्या मित्रांशी व्यापार, सामरिक भागीदारी आणि दोन्ही देशांसाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काश्मीरमधील तणाव कमी करण्याबाबत चर्चा झाली. परिस्थिती कठीण आहे पण दोघांशी उत्तम चर्चा झाली ” असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

यापूर्वीही काश्मीर मुद्यावरुन पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवर चर्चा केली होती. त्यावेळी ट्रम्प यांनी हे प्रकरण दोन्ही देशांनी करून मिटवावे, असा सल्ला इम्रान खान यांना सल्ला दिला होता. काश्मीर मुद्यावरून पाकिस्तानने टोकाची भूमिका घेतली असून भारतासोबतचे संबंध तोडले आहेत. त्याचबरोबर युद्धाची भाषणाही पाकिस्तानकडून केली जात असल्याने दोन्ही देशातील संबंधात प्रचंड तणाव निर्माण झालेला आहे.

मोदींशी काय झाली चर्चा –

मोदी आणि ट्रम्प यांच्या दूरध्वनीवरून झालेल्या संवादात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे थेट नाव न घेता त्यांच्या भारतविरोधी वक्तव्याबद्दल मोदी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचं समजतंय. जवळपास 30 मिनिटे दोघांनी संवाद साधला. या संवादात द्विपक्षीय संबंधांपासून प्रादेशिक विषयांपर्यंत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. दहशतवादमुक्त आणि हिंसाचारविरहीत वातावरणाची गरज मोदी यांनी या वेळी व्यक्त केली; तसेच कोणत्याही अपवादाशिवाय सीमेवरील दहशतवाद रोखण्यावर त्यांनी भर दिल्याची माहिती आहे.