दक्षिण आशियातील दहशतवादाचा मुकाबला करून शांतता आणि स्थैर्य स्थापित करण्याबाबत गुरुवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यात मतैक्य झाल्याचे चीनने स्पष्ट केले आहे. दहशतवाद्यांची आश्रयस्थाने उद्ध्वस्त करण्यासाठी अमेरिका पाकिस्तानवर दबाव आणत असल्याच्या पाश्र्वभूमीवर दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या मतैक्याला महत्त्व आहे.

दोन्ही नेत्यांनी दहशतवादविरोधी प्रश्नांवर चर्चा केली आणि दक्षिण आशियात शांतता आणि स्थैर्य स्थापित करण्याबाबत दोघांमध्ये मतैक्य झाले, त्या व्यतिरिक्त दोन्ही नेत्यांमध्ये कोणती चर्चा झाली त्याबाबत आपण अनभिज्ञ असल्याचे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनिंग यांनी सांगितले.

पाकिस्तानातून होणाऱ्या दहशतवादाबाबत भारताकडून व्यक्त करण्यात येणाऱ्या चिंतेबाबत ट्रम्प आणि जिनिपग यांच्यात चर्चा झाली का, त्याची आपल्याला माहिती नसल्याचे चुनिंग म्हणाल्या. दहशतवादविरोधात लढण्यासाठी दोन्ही नेत्यांनी अन्य देशांसमवेत एकत्रित काम करण्याची तयारी दर्शविली असल्याचे प्रवक्त्या म्हणाल्या. अफगाणिस्तानच्या प्रश्नाबाबतही दोन्ही नेत्यांनी चर्चा केली, दक्षिण आशिया आणि अफगाणिस्तान हे महत्त्वाचे मुद्दे होते. दहशतवादी हे मानवतेला धोका आहेत त्यामुळे आपण आणि जिनपिंग कट्टर इस्लामी दहशतवाद थांबविण्याचा प्रयत्न करणार आहोत, असेही ट्रम्प म्हणाले.

उत्तर कोरिया, व्यापाराबाबत ट्रम्प- जिनपिंग चर्चा

उत्तर कोरियाचा अण्वस्त्र कार्यक्रम आणि दोन्ही देशांमधील व्यापार संबंध या बाबत गुरुवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यात चर्चा झाली. अमेरिकेच्या अध्यक्षांचे शाही स्वागत करण्यात आल्यानंतर दोन्ही नेत्यांची बीजिंगमधील ग्रेट हॉल ऑफ द पीपलमध्ये भेट झाली. उत्तर कोरियातील तिढा सोडविता येणे शक्य असल्याचा विश्वास आम्हा दोघांनाही आहे, असे ट्रम्प म्हणाले.