दिल्ली पोलिसांना विद्यापीठाच्या परिसरामध्ये प्रवेशास परवानगी न देण्याची मागणी जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या (जेएनयू) शिक्षक संघटनेने सोमवारी विद्यापीठाच्या कुलगुरूंकडे केली. याशिवाय, उमर खालिदसह इतर विद्यार्थ्यांवर ठेवण्यात आलेला देशद्रोहाचा आरोप मागे घेतला गेलाच पाहिजे, असा ठाम निर्धार शिक्षक संघटनेने कुलगुरूंकडे व्यक्त केला.

VIDEO : ‘आय अॅम उमर खालिद बट आय अॅम नॉट अ टेररिस्ट’

केवळ एका व्हिडिओच्या आधारे विद्यार्थ्यांवर देशद्रोह आणि गुन्हेगारी कटाचा आरोप लावता येऊ शकत नाही, अशी माहिती कायदेतज्ज्ञांनी दिली असल्याचे शिक्षक संघटनेच्या प्रतिनिधीने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. यासोबतच सध्या सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या अंतर्गत समितीत बदल करण्याची गरज असल्याचाही सल्ला शिक्षक संघटनेने कुलगुरूंना दिला. विद्यापीठात सकारात्मक वातावरण तयार होण्याची गरज आहे. तेव्हाच विद्यार्थी विद्यापीठाच्या अंतर्गत समितीच्या चौकशीला सामोरे जातील, असेही शिक्षक संघटनेकडून सांगण्यात आले आहे.

‘जेएनयू’त झालं काय?..चाललंय काय?

दरम्यान, ‘जेएनयू’च्या विद्यार्थी संघटनेशी बातचित करण्याचा विद्यापीठ प्रशासनाकडून कोणताही संपर्क साधला गेला नसल्याची माहिती विद्यार्थी संघटनेची उपाध्यक्ष शेहला रशीद हिने सांगितले. तसेच दिल्ली पोलिसांना विद्यापीठात प्रवेश द्यावा की नाही हा पूर्णपणे कुलगुरूंचा अधिकार आहे. त्याबद्दल मी काहीच बोलू शकत नाही, असेही ती पुढे म्हणाली.