भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना लोकसभेसाठी पसंतीच्या मतदारसंघातून उमेदवारी न देण्यात आल्याप्रकरणी मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेकडून भाजपला इशारा देण्यात आला आहे. नरेंद्र मोदी, अरूण जेटली यांना स्वत:च्या पसंतीच्या मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविता येऊ शकते तर मग पक्षातील ज्येष्ठ नेते असणा-या अडवाणींच्या उमेदवारीबाबत पक्षाचा दुजाभाव का असा सवाल सेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून उपस्थित करण्यात आला आहे. तसेच भाजपमध्ये मोदीपर्वाला प्रारंभ झाला असला तरी त्यामुळे लालकृष्ण अडवाणी यांची सद्दी संपली असल्याचा अर्थ काढू नये असेसुद्धा शिवसेनेचे मुखपत्र असणा-या ‘सामना’ वृत्तपत्रातून सांगण्यात आले. ‘सामना’ वृत्तपत्रामधील संपादकीय लेखातून अडवाणी यांना देण्यात येणा-या सापत्न वागणुकीवरून भाजपला लक्ष्य करण्यात आले. आगामी लोकसभेसाठी गुजरातच्या गांधीनगऐवजी भोपाळमधून उमेदवारी देण्याची मागणी लालकृष्ण अडवाणी यांनी पक्षाकडे केली होती. मात्र, भाजपकडून अडवाणी यांनी गांधीनगरमधूनच लोकसभा निवडणूक लढवावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. राजनाथ सिंग आणि सुषमा स्वराज यांच्या मनधरणीनंतर अडवाणी गांधीनगरमधून निवडणूक लढविण्यास राजीसुद्धा झाले होते.