महिलांसाठी ‘घर’ सर्वात असुरक्षित ठिकाण

भारतात हुंडा पद्धती विरोधात कायदे करूनही हुंडाबळी ठरलेल्या महिलांचे प्रमाण अधिक आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या एका अभ्यासात म्हटले आहे. जगात घर हे महिलांसाठी सर्वात घातक ठिकाण असल्याची टिपणी त्यात केली आहे. जगात गेल्या वर्षी ८७,००० महिला मारल्या गेल्या होत्या व त्यातील ५८ टक्के म्हणजे पन्नास हजार महिला या कुटुंबीय किंवा पती, प्रियकर यांच्या हिंसाचारात मारल्या गेल्या आहेत.

दर तासाला सहा महिला त्यांच्या ओळखीतील माणसांकडूनच मारल्या जातात. संयुक्त राष्ट्र अमली पदार्थ व गुन्हे कार्यालयाने एका अभ्यासात म्हटले आहे, की भारतात २०१६ मध्ये महिलांचा हिंसाचारातील मृत्यूचा दर २.८ टक्के होता. तो केनिया (२.६), टांझानिया (२.५), अझरबैजान (१.८), जॉर्डन (०.८), ताजिकीस्तान (०.४) यांच्यापेक्षा अधिक आहे. भारतात १५ ते ४९ वयोगटातील ३३.५ टक्के महिला या शारीरिक हिंसाचारास बळी पडतात. १९९५-२०१३ दरम्यानच्या माहितीवरून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. भारतात हुंडाबळीची स्थिती चिंताजनक असून राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या १९९९ ते २०१६ दरम्यानच्या माहितीनुसार भारतात वर्षांला ४० ते ५० टक्के महिला हुंडाबळीच्या शिकार ठरतात. भारत सरकारने १९६१ मध्ये हुंडाविरोधी कायदा करूनही त्याचा फारसा उपयोग झालेला नाही. अजूनही देशात हुंडापद्धती चालू असून हिंसाचारात महिलांच्या मृत्यूत हुंडाबळीचे प्रमाण जास्त आहे. भारत व पापुआ न्यू गिनी या देशात जादूटोण्याच्या संशयावरून महिलांना ठार करण्याचे प्रकार होत आहेत पण हे प्रमाण तुलनेने कमी आहे.

यूएनओडीसीचे संचालक युरी फेडोटोव यांनी सांगितले, की असमानता, सापत्नभाव, लिंगभेद अजून कायम आहे. जगात एक लाख महिलांमध्ये १.३ महिला या त्यांच्या घरातील किंवा जवळच्या कुटुंबीयांकडूनच मारल्या जातात. आफ्रिका व अमेरिकेत जोडीदाराकडून महिलांचे मारले जाण्याचे प्रमाण अधिक असून ते आफ्रिकेत लाखात ३.१, अमेरिकेत १.६, ओशियानियात १.३, आशियात ०.९. युरोपात ०.७ आहे.