इंडिअन स्कूल ऑफ बिझनेसमध्ये प्राध्यापक असलेल्या डॉ. कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांची देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी केंद्र सरकारने नियुक्ती केली आहे. पुढील तीन वर्षांसाठी ते या पदावर कार्यरत राहतील. यापूर्वी या पदावर असलेल्या अरविंद सुब्रमण्यम यांची ते जागा घेतील. अरविंद सुब्रमण्यम यांनी याच वर्षी जुलै महिन्यांत व्यक्तिगत कारणाने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

डॉ. कृष्णमूर्ती सुब्रमण्यम हे सध्या इंडिअन स्कूल ऑफ बिझनेस या संस्थेमध्ये फायनान्स विभागाचे सहाय्यक प्राध्यापकपदी कार्यरत आहेत. शिकागोमधून त्यांनी आपली पीएचडी पूर्ण केली आहे. तसेच आयआयटी आणि आयआयएममधून त्यांनी शिक्षण घेतले आहे. सुब्रमण्यम यांची गणना जगातील उच्च स्तरीय बँकिंग, कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि इकॉनॉमिक पॉलिसी तज्ज्ञांमध्ये होते.

सेबीच्या कॉर्पोरेट गवर्नन्स तज्ज्ञांची समिती आणि आरबीआयसाठी बँकांच्या गव्हर्नन्सचे काम करणाऱ्या समितीचा भाग असण्याबरोबर कॉर्पोरेट गव्हर्नन्स आणि भारतात बँकिंग सुधारणांसाठी त्यांना ओळखले जाते. या सर्व क्षेत्रांमधील त्यांच्या चांगल्या कामगिरीमुळे त्यांची या पदासाठी निवड करण्यात आली आहे. सुब्रमण्यम हे वैकल्पिक गुंतवणूक धोरण, प्राथमिक-माध्यमिक बाजार आणि संशोधनावर आधारित सेबीच्या समितीचा भागही राहिले आहेत.

करिअरच्या सुरुवातीला त्यांनी न्यूयॉर्कमधील जेपी मॉर्गन या कंपनीमध्ये कन्सल्टंट म्हणून काम केले होते. त्यानंतर त्यांनी आयसीआयसीआयच्या एलाइट डिरेव्हेटिव्हज गटात व्यवस्थापक म्हणून आपली सेवा दिली आहे.