मुख्यमंत्री नबाम तुकींना हटवून बंडखोरांकडून ‘नव्या मुख्यमंत्र्यांची’ निवड
अरुणाचल प्रदेशच्या राजकारणात गुरुवारी नाटय़मय घडामोडी घडल्या. मुख्यमंत्री नबाम तुकी यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकारला ‘हटवण्यासाठी’ विरोधी पक्ष भाजपसह काँग्रेसच्या बंडखोर आमदारांनी एका स्थानिक हॉटेलमध्ये एकत्र येऊन काँग्रेसच्या एका बंडखोर आमदाराची नवे ‘मुख्यमंत्री’ म्हणून निवड केली.
या आमदारांनी बुधवारी एका समाजभवनाच्या (कम्युनिटी हॉल) परिसरात उभारलेल्या एका तात्पुरत्या ‘विधानसभेत’ सभागृहाचे अध्यक्ष नबाम रेबिया यांच्यावर महाभियोग प्रस्ताव पारित करून त्यांना ‘हटवल्याच्या’ दुसऱ्याच दिवशी या चमत्कृतीपूर्ण घडामोडी घडल्या.
भाजपच्या ११ व २ अपक्ष आमदारांनी काँग्रेसच्या २० बंडखोर आमदारांशी हातमिळवणी केली आणि विधानसभेचा परिसर बुधवारपासून सील करण्यात आल्यामुळे येथील एका हॉटेलच्या कॉन्फरन्स रूममध्ये बैठक घेतली. काँग्रेसचे बंडखोर असलेले उपाध्यक्ष टी. नोरबू थाँगडोक यांच्या अध्यक्षतेखाली या सर्वानी भाजपच्या व अपक्ष आमदारांनी मांडलेला ‘अविश्वास’ ठराव मंजूर करण्यात आला.
६० सदस्यांच्या विधानसभेतील २० बंडखोर काँग्रेस आमदारांसह एकूण ३३ सदस्यांनी यानंतर काँग्रेसचे बंडखोर आमदार कालिखो पुल यांची राज्याचे ‘नवे मुख्यमंत्री’ म्हणून निवड केली. मुख्यमंत्री नबाम तुकी व त्यांच्या २६ समर्थक आमदारांनी ही सर्व कार्यवाही ‘बेकायदेशीर व घटनाविरोधी’ असल्याचे सांगून तिच्यावर बहिष्कार घातला.
राज्यपाल ज्योतीप्रसाद राजखोवा यांनी लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेल्या सरकारला डावलून लोकशाहीचा ‘अभूतपूर्व खून’ केला असल्यामुळे, राज्यघटनेचे ‘रक्षण’ करण्यासाठी हस्तक्षेप करण्याची विनंती करणारे पत्र मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे.