तेलंगणाच्या जगतियाल जिल्ह्यातील कोंडागट्टू घाटात झालेल्या भीषण अपघातातील बस चालकाला राज्य सरकारने गेल्याच महिन्यात सर्वोत्तम चालक पुरस्कार दिला होता. राज्य परिवहन मंडळाची बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात ५७ जणांचा मृत्यू झाला होता. जखमींपैकी एका महिलेचा मृत्यू झाला असून आकडा ५८ वर पोहोचला आहे.

मर्यादेपेक्षा जास्त प्रवशांना घेऊन जाणारी राज्य परिवहन मंडळाची बस मंगळवारी दरीत जाऊन कोसळली. या अपघातात ५७ जणांचा मृत्यू झाला होता, तर २८ जण जखमी झाले. महामार्गावर झालेल्या अपघातांपैकी हा एक भीषण अपघात असल्याचं म्हटलं जात आहे.

तेलंगणा राज्य रस्ते परिवहन वाहतूक महामंडळाने (TSRTC) राज्य सरकारकडे प्राथमिक अहवाल सादर केला असून चालकाने समोरुन येणाऱ्या वाहनाशी धडक टाळताना किंवा वळण घेताना बसवरील नियंत्रण घालवलं असावं असा अंदाज व्यक्त केला आहे.

पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मृतांचा आकडा ५७ होता, मात्र जखमींपैकी एका महिलेचा मृत्यू झाल्याने आकडा ५८ वर पोहोचला आहे. २७ जणांवर अद्यापही उपचार सुरु असून त्यातील तिंघांची प्रकृती गंभीर आहे. सर्व मृतदेहांची ओळख पटली असून शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबियांकडे सोपवण्यात आले आहेत.