अवयव प्रत्यारोपणामध्ये वाहतूक कोंडीची अडचण येऊ नये यासाठी आता ड्रोनची मदत घेण्यात येणार आहे. यासाठी अधिकृत रुग्णालयांना ड्रोनपोर्ट्स तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी दिली.

मोठय़ा आकाराच्या ड्रोनची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली असून त्यानंतर महिन्याभराने परवाने देण्यास सुरुवात होणार आहे, सध्या २.० या ड्रोन धोरणावर काम सुरू आहे. मोठय़ा रुग्णालयांमध्ये हवाई मार्गिका तयार करण्यावरही विचार सुरू आहे, असे सिन्हा म्हणाले.

अवयव प्रत्यारोपण सुविधा असलेल्या रुग्णालयांमध्ये ड्रोनपोर्ट्स तयार केल्यानंतर अवयव वाहतुकीसाठी निर्माण होणाऱ्या अडचणींचे प्रमाण कमी होणार आहे. नव्या धोरणावर १५ जानेवारी रोजी होणाऱ्या ग्लोबल एव्हिएशन परिषदेमध्ये चर्चा केली जाणार आहे. ड्रोनचा वापर वाढावा आणि त्यामध्ये सुलभता यावी यासाठी विशेष डिजिटल स्पेसनिर्मिती केली जाणार आहे. सामान वाहतुकीसाठी ड्रोनचा वापर करण्याचा विचार असून त्याविषयीची श्वेतपत्रिका लवकरच काढण्यात येईल, असे सिन्हा म्हणाले.