स्पॉट फिक्सिंगमुळे पोलिस कोठडीत जाण्याच्या आठवड्यापूर्वीच राजस्थान रॉयल्सचा गोलंदाज एस. श्रीशांत याला संघातून निलंबित करण्यात आले होते. मद्यपान करून संघाचे प्रशिक्षक पॅड अप्टन यांच्याशी हुज्जत घातल्यामुळे संघाच्या व्यवस्थापनाने त्याच्यावर ही कारवाई केली होती, अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱयांनी दिली.
९ मे रोजीच्या सामन्यानंतर श्रीशांतने मद्यसेवन केले होते. त्यामुळे त्याचे प्रशिक्षक पॅडी अप्टन यांच्याशी खटके उडाले होते. म्हणूनच श्रीशांतचा त्यानंतरच्या सामन्यात संघात समावेश करण्यात आला नाही. याच कारणास्तव मुंबईत होणाऱया १५ मेच्या सामन्यावेळी श्रीशांत खेळाडूंसोबत ट्रायडेन्ट हॉटेलमध्ये न राहता तो वैयक्तिकपणे दुसऱ्या हॉटेलमध्ये वास्तव्य करत होता, असे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नऊ मेचा सामना संपल्यानंतर श्रीशांतने बेसुमार मद्यपान केले. त्याच दिवशीच्या सामन्यातील आपल्या गोलंदाजीतील दुसरे षटक त्याने बुकींसोबत फिक्स केले होते. मद्यपान केलेल्या अवस्थेत हॉटेलवर आल्यावर त्याने संघातील काही खेळाडूंना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. प्रशिक्षक अप्टन हस्तक्षेप करायला गेल्यावर त्याने त्यांच्याशीही हुज्जत घातली. अप्टन यांनी हा सगळा विषय संघ व्यवस्थापनापर्यंत नेल्यावर श्रीशांतला निलंबित करण्यात आले होते.