दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू दिनेश सिंग यांनी चार वर्षांच्या स्नातकपूर्व कार्यक्रमावरून झालेल्या वादातून राजीनामा दिला आहे. दिल्ली विद्यापीठाचे माध्यम समन्वयक मलय नीरव यांनी सांगितले की, कुलगुरूंनी राजीनामा दिला आहे. दिल्ली विद्यापीठात स्नातकपूर्व चार वर्षांचा कार्यक्रम राबवण्यात दिनेश सिंग यांचा पुढाकार होता, परंतु विद्यापीठ अनुदान आयोगाने मात्र चार वर्षांचा कार्यक्रम कुठल्याही विद्यापीठाने राबवण्यास विरोध केला आहे.  
दिनेश सिंग हे गणिताचे प्राध्यापक असून गेली चार वर्षे ते कुलगुरू होते. दिल्ली विद्यापीठ व विद्यापीठ अनुदान आयोग यांच्यातील वादातून त्यांनी राजीनामा दिला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने दिल्ली विद्यापीठास चार वर्षांचा पदवी कार्यक्रम रद्द करून तीन वर्षांचा पदवी कार्यक्रम राबवण्यास सांगितले होते.
दिल्ली विद्यापीठाला आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश मिळाले होते. विद्यापीठ अनुदान आयोगाचा आदेश हा विद्यापीठांच्या स्वायत्ततेवर आक्रमण करणारा आहे, असे दिनेश सिंग यांचे मत आहे. मनुष्यबळ विकास खात्याने मात्र दिल्ली विद्यापीठ व विद्यापीठ अनुदान आयोग यांच्यातील वादात हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता. आजपासून सुरू होणारी प्रवेश प्रक्रिया दिल्ली विद्यापीठाने लांबणीवर टाकली होती. कुलगुरूंच्या राजीनाम्यामुळे आता हा पेच आणखी चिघळला आहे. विद्यापीठाशी संलग्न ६४ महाविद्यालयात ५४००० जागा असून त्यासाठी २.७ लाख विद्यार्थी इच्छुक आहेत. विद्यार्थ्यांनी मात्र कुलगुरूंच्या राजीनाम्यानंतर नाचून आनंद व्यक्त केला.