भारतीय वंशाची एक महिला व्यावसायिक आपल्या पतीच्या पासपोर्टवर ब्रिटनमधील मँचेस्टरवरून दुबई आणि तेथून दिल्लीत पोहोचली. विशेष म्हणजे ही गंभीर चूक भारतीय सुरक्षा पथकाला दिसून आली. अमिरात एअरलाइनने या घटनेची चौकशी सुरू केली आहे. गीता मोधा असे या महिलेचे नाव असून ती मँचेस्टरमधील रोशलम परिसरात बुटिक चालवते. दि. २३ एप्रिल रोजी प्रवासात ती चुकून आपला पती दिलीपचा पासपोर्ट घेऊन विमानतळावर रवाना झाली.

मँचेस्टर इव्हनिंग न्यूजच्या वृत्तानुसार, ५५ वर्षीय गीता चेक इन करण्यात आणि विमानात बसण्यात यशस्वी झाल्या. दुबईमध्ये काही काळ थांबून त्या नवी दिल्लीला पोहोचल्या. ओव्हरसीज इंडियन सिटीजन (ओसीआय) कार्डधारक असलेल्या गीता यांना दिल्लीत उतरल्यानंतर आपला पासपोर्ट दाखवायचा होता. परंतु, त्यांना भारतात प्रवेश नाकारण्यात आला.

त्या म्हणाल्या, प्रवाशांची तपासणी योग्य पद्धतीने केली जात नाही, हे खूप चिंताजनक आहे. विमानतळांवर कडक सुरक्षा व्यवस्था आहे. तरीही २०१८ मध्येही तुम्ही असे करू शकता. भारतीय अधिकाऱ्यांनी गीता यांना पुन्हा दुबईला पाठवण्याची व्यवस्था केली.

विमान कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले की, सर्व विमानकंपन्यांप्रमाणे आम्ही विमानतळ अधिकाऱ्यांच्या संपर्कात असतो. पासपोर्ट तपासणीशी निगडीत नियमांची गंभीरतेने व्हावी हे आम्ही निश्चित करतो. याप्रकराी आमच्याकडून नियमांचे पालन केले गेले नाही. त्यामुळे आम्ही मोधा यांची माफी मागतो.

दरम्यान, गीता यांनी मँचेस्टर विमानतळावर चेक इन दरम्यान आपला पासपोर्ट दाखवला आणि विमानात जाण्यापूर्वीही दाखवला होता. दुबईत थांबल्यानंतर त्यांना आपला पासपोर्ट दाखवावा लागला नाही. कारण त्यांच्याकडे ओसीआय कार्ड होते. दिल्ली विमानतळावर ही बाबत उघडकीस आली. दुसरीकडे व्यक्तीच्या ओळखीची खात्री करण्याचे काम विमान कंपनीचे असल्याचे मँचेस्टर विमानतळाने स्पष्ट केले आहे.