News Flash

लसीच्या चाचण्यांसाठी ६ ते ९ महिन्यांचा अवधी

जागतिक आरोग्य संघटनेच्या वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांचे मत

प्रतिकात्मक छायाचित्र

 

कोविड १९ वर भारतातील सात कंपन्यांनी लशी तयार केल्या आहेत ही निश्चितच उत्साह वाढवणारी कामगिरी आहे. त्या लशींची चाचणी करावीच लागणार आहे, पण या सगळ्या प्रक्रियेला सहा ते नऊ महिन्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे यातील कुठलीही लस २०२१ पूर्वी येण्याची शक्यता नाही असे जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटले आहे.

आयसीएमआरने १२ मुख्य शोधकर्त्यां संस्थांना लस १५ ऑगस्टपर्यंत तयार झाली पाहिजे अशा आशयाचे आदेशवजा पत्र पाठवल्यानंतर इतक्या घाईने लस तयार करणे शक्य आहे का, त्यात काही राजकीय हेतू आहेत का, शिवाय अशी लस घाईने तयार केली तर ती कितपत सुरक्षित असेल याबाबत टीकेची झोड उठली होती. त्याबाबत स्वामीनाथन यांनी सांगितले की, सर्व काही नियोजनाप्रमाणे पार पडले तर टप्पा १ ते टप्पा ३ पर्यंतच्या चाचण्या सहा ते नऊ महिन्यात पूर्ण होऊ शकतात. त्यामुळे वास्तववादी कालबद्धता पाहिली तर कुठलीच लस या वर्षी येऊ शकत नाही.

टप्पा ३ मधील चाचण्याच टाळता येऊ शकतात का, याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, असे करता येत नाही कारण टप्पा तीन हा ती लस कितपत प्रभावी आहे हे ठरवणारा असतो. त्यात ठराविक संख्येने लोकांवर चाचण्या कराव्याच लागतात. जागतिक आरोग्य संघटनेने कोविड लशीचा संपूर्ण निर्मिती क्रम कसा असतो याची माहिती जाहीर केलेली आहे. त्यानुसार टप्पा दोन व तीनमध्ये सर्व सोपस्कारांचे पालन करावे लागते त्याशिवाय ती लस सुरक्षित म्हणता येत नाही. असे असले तरी मुलांना बालपणी ज्या लशी दिल्या जातात त्या सर्व भारतातच तयार होतात व जागतिक आरोग्य संघटनाही त्या खरेदी करते. भारतातील वैज्ञानिक संस्था कुठल्याही वैद्यकीय आव्हानांना सामोरे जाण्यास सक्षम आहेत त्यामुळेच आपल्या देशात एक किंवा अधिक यशस्वी  करोना लशी तयार होतील असा विश्वास वाटतो, असे त्या म्हणाल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 6, 2020 12:14 am

Web Title: duration of 6 to 9 months for vaccine tests abn 97
टॅग : Coronavirus
Next Stories
1 नेपाळच्या सत्तारूढ पक्षात फुटीचे संकेत
2 ट्रम्प यांचे स्वातंत्र्यदिनी विरोधकांवर टीकास्त्र
3 देशात २४ तासांत २४,८५० रुग्ण
Just Now!
X