कोणत्याही पक्षाचा नामोल्लेख न करता मोदींची टीका

नवी दिल्ली : घराणेशाहीचे राजकारण हा लोकशाहीचा सर्वात मोठा शत्रू असून त्यामुळे नव्या स्वरूपातील हुकूमशाहीचा उदय झाला आणि देशावर अकार्यक्षमतेचा बोजा पडल्याची जोरदार टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी येथे कोणत्याही पक्षाचा नामोल्लेख न करता केली. तथापि, मोदी यांनी यापूर्वी केलेली टीका पाहता त्यांचा रोख काँग्रेसवर होता हे अधोरेखित झाले.

दुसऱ्या राष्ट्रीय युवा संसद महोत्सवाच्या समारोप समारंभात पंतप्रधान दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते त्यावेळी त्यांनी घराणेशाहीच्या राजकारणावर चौफेर हल्ला चढविला.

घराणेशाहीमुळे ज्यांचा उदय झाला त्यांच्यात कायद्याबद्दल आदर नाही आणि भीतीही नाही कारण आपल्या पूर्वसुरींना भ्रष्टाचाराबद्दल जबाबदार धरण्यात आले नाही तसेच आपलेही कोणीही काहीही करू शकणार नाही, असा त्यांचा समज झाला आहे, असेही मोदी म्हणाले. स्वत:च्याच कुटुंबामध्ये त्यांना अशी उदाहरणे पाहावयास मिळाली असल्याने त्यांच्या मनात कायद्याबद्दल आदर अथवा भीतीही नाही, असे ते म्हणाले. राजकारणाचे संरक्षण गरजेचे असल्याने युवकांनी राजकारणात यावे, असे आवाहनही मोदी यांनी या वेळी केले.

राजकारणामध्ये आडनावांच्या आधारावर जे निवडून येतात त्यांना भवितव्य नसते हे सत्य आहे, मात्र राजकारणातील या विकाराचे संपूर्णपणे निर्मूलन झालेले नाही, असेही ते म्हणाले. अद्यापही असे लोक आहेत की ज्यांची वागणूक, कल्पना आणि उद्देश आपल्या कुटुंबाच्या राजकारणाचा बचाव करणे हेच आहे. धराणेशाहीच्या राजकारणामुळे ‘आपण आणि आपले कुटुंब’ हीच भावना वृद्धिंगत होते, ‘देश प्रथम’ ही भावना मागे पडते, असेही पंतप्रधान म्हणाले.