ताडी हे एक असं पेय आहे जे दक्षिण भारतात स्थानिकांची बरीच पसंती मिळवतं. देशी दारुच्याच विभागात गणल्या जाणाऱ्या ताडीची तयार होण्याची प्रक्रिया नेहमीच आकर्षणाचा विषय ठरते. नैसर्गिकरित्या ताडाच्या झाडावरच तयार होणारं हे पेयं झाडावरुन उतरवणाऱ्या व्यक्तींवर वाटसरु आणि प्रवाशांच्याही नजरा खिळतात. मुळात झाडावर चढण्याची त्यांची कला आणि ताडी उतरवण्याचं कसब हे प्रशंसनीय. पण, याकडे बऱ्याचदा दुय्यम दृष्टीकोनाने पाहिलं जातं. पण, या कामामुळे केरळच्या इ.पी. सॅलिमॉन दिवसाला सुमारे ४ हजार रुपये कमवत आहेत. सुगीच्या दिवसात महिन्याला त्यांच्या कमाईचा आकडा सव्वा लाखांवरही जातो. झालात ना तुम्हीही थक्क?

केरळच्या या व्यक्तीच्या कमाईचे आकडे सध्या अनेकांनाच चक्रावून सोडत आहेत. ९ ते ५ अशा वेळेत नोकरी करण्याऱ्यांचं मासिक उत्पन्न आणि सॅलिमॉन यांचं मासिक उत्पन्न पाहिलं तर या आकड्यांमध्ये फारसा फरक दिसून येत नाही. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार ताडी विक्रेत्यांकडून भाडेतत्वावर घेतली जातात. एक लीटर ताडी ६० ते ७० रुपये प्रतिलीटर प्रमाणे हे गणित ठरवलं जातं. ज्यामध्ये ज्या व्यक्तीकडे झाडांची मालकी आहे त्याला प्रतिलीटर मागे ३० रुपये मिळतात. तर झाडावरुन ताडी उतरवणाऱ्या व्यक्तीला एक लीटर ताडीमागे १८ रुपये मिळतात. या गणितावर नजर टाकली असता सॅलिमॉन यांच्या कमाईचं समीकरण समजणं अधिक सोपं होतं. कारण, ते दिवसाला अशी २१० लीटर ताडी उतरवण्याचं काम करतात. त्याशिवाय केरळच्या ‘ताडी वेल्फेअर फंड बोर्ड’चं सदस्यत्व असल्यामुळे त्यांना रोजंदारी भत्ता म्हणून दर दिवशी ३०२ रुपये मिळतात. या वेल्फेअर बोर्डाकडून भविष्य निर्वाह निधीची सुविधाही पुरवण्यात येते. शिवाय त्यात वार्षिक बोनसचाही समावेश असतो, ज्याअंर्गत गेल्या वर्षी त्यांना अडीच लाख रुपये मिळाले होते.

‘या क्षेत्राकडे युवा पिढीने पाठ फिरवली आहे. त्यामुळे मला एक दिवसाची सुट्टी घ्यायची असली तरीही माझ्याऐवजी काम करणाऱ्या व्यक्तीची सोय करतानाही बऱ्याच अडचणी येतात’, असं सॅलिमॉन यांनी स्पष्ट केलं. कष्ट करण्याची त्यांची ही वृत्ती आणि कामाप्रती असणारी भावना पाहता काही दिवसांपूर्वी त्यांचा राज्य शासनाने गौरवही केला होता. गेल्या वर्षभरात ४० हजार लीटर ताडी उतरवण्यासाठी त्यांचा गौरव करण्यात आला होता. जे पाहता सॅलिमॉन यांच्या कूरोप्पडा, मदप्पड या त्यांचं मूळ गावही प्रकाशझोतात आलं आहे. केरळच्या याच भागात ताडाची झाडं मोठ्या प्रमाणात आढळतात.
गेल्या ३२ वर्षांपासून सॅलिमॉन याच क्षेत्रात काम करत आहेत. अविरतपणे काम करणारे ते सुट्टीचा विचार तसा फार कमीच करतात. सकाळी ७ वाजल्यापासून सुरु झालेला त्यांचा दिवस सायंकाळी ७ च्या सुमारास संपतो.

वाचा : फ्लॅशबॅक : माधुरीचे ‘एक दो तीन…’ कायम १ नंबर

आपल्या या अनोख्या कामाविषयी सांगत ते म्हणाले, ‘मुळात कामातून सुट्टी घ्यायची म्हटलं की माझ्यासमोर एक मोठा प्रश्नच पडतो. कारण, ताडी ही रोज उतरवावी लागते, रोज विक्रेत्यांपर्यंत पोहोचवावी लागते.’ आपल्या या व्यग्र कामामुळे त्यांना बऱ्याचदा कौटुंबिक कार्यक्रमांना आणि सोहळ्यांनाही मुकावं लागतं ही एकच खंत त्यांनी व्यक्त केली. कष्ट करुन सॅलिमॉन यांनी आपल्या कुटुंबाचा गाडा इथवर आणला आहे. त्यांची मोठी मुलगी एम. कॉमचं शिक्षण घेतेय तर, धाकटी मुलगी बी. कॉमचं शिक्षण घेत आहे. ताडी उतरवण्याचं काम करणाऱ्या सॅलिमॉन यांची स्वत:ची ऑटो रिक्षाही आहे. आपल्या मुलींच्या उच्च शिक्षणाचा ध्यास घेतलेल्या सॅलिमॉन हे झाडावरुन स्पिरिट (दारु) उतरवण्याचं काम करत असले, तरीही आयुष्याकडे पाहण्याचं त्यांचं स्पिरीट हे खरंच वाखाणण्याजोगं आहे असं म्हणायला हरकत नाही.