‘सीव्हिजिल’द्वारे निवडणूक आयोगाकडे पहिली तक्रार!

रितिका चोप्रा, नवी दिल्ली

आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होऊ नये यासाठी सर्वसामान्यांना तक्रार करता यावी याकरिता सुरू झालेल्या ‘सीव्हिजिल अ‍ॅप’वरून पहिली तक्रार दाखल झाली आहे. त्या तक्रारीवरून निवडणूक आयोगाने भाजपचे दिल्लीतील आमदार ओमप्रकाश शर्मा यांच्या फेसबुकवरील दोन पोस्ट हटविण्याचा आदेश दिला आहे.

शर्मा यांनी फेसबुक या समाजमाध्यमावर विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचे छायाचित्र आणि त्याबाबतचा मजकूर लिहिला होता. कोणत्याही जवानांची छायाचित्रे उमेदवारांनी आणि राजकीय पक्षांनी प्रसिद्ध करू नयेत, असा आदेश आयोगाने आधीच दिला आहे. त्यामुळे या छायाचित्राविरोधात आयोगाच्या सीव्हिजिल अ‍ॅपवर तत्काळ तक्रार दाखल झाली. त्यानंतर आयोगाने फेसबुकला अभिनंदन यांचा फोटो हटविण्याचा आदेश दिला. निवडणूक आयोगाने याबाबत फेसबुकचे वरिष्ठ अधिकारी शिवनाथ ठुकराल यांना याबाबत निर्देश दिल्याचे समजते.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीवेळी सीव्हिजिल अ‍ॅप सुरू झाले होते. मात्र आता लोकसभा निवडणुकीसाठी त्याचा प्रथमच वापर होत आहे.

शर्मा यांनी एक मार्चला दोन पोस्ट फेरबुकवर टाकली होती. त्या दोन्हीमध्ये विंगकमांडर वर्धमान यांचे छायाचित्र होते. त्याच बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी, पक्षाध्यक्ष अमित शहा आणि स्वत: शर्मा यांचीही छबी झळकत होती. ‘‘इतक्या कमी वेळात मोदींनी बहादूर अभिनंदन यांना परत आणले हा कूटनीतीचा विजय आहे,’’ अशा आशयाचा मजकूर एका पोस्टमध्ये होता. तर दुसऱ्यात ‘‘पाकिस्तान झुकले, देशाचा वीर जवान परतला,’’ असे म्हटले होते.

निवडणूक आयोगाने मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना एका परिपत्रकाद्वारे राजकीय प्रचारासाठी लष्कराचा वापर करू नका असे निर्देश दिले होते. देशाचे लष्कर हे सीमा तसेच सुरक्षा आणि राजकीय व्यवस्थेचे रक्षणकर्ते आहे. आधुनिक लोकशाहीत निष्पक्ष आहेत. त्यामुळे त्यांचा वापर प्रचारात करू नये, असे आयोगाने बजावले होते. २०१३ पासून समाजमाध्यमांना ही आदर्श आचारसंहिता लागू आहे. या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सॅप यांनी प्रचाराचा स्तर घसरू नये यासाठी सहकार्य करण्याचे मान्य केले आहे.