लोकायुक्त एन. के. मेहरोत्रा यांनी केलेल्या शिफारशीवरून राज्यातील दोन आमदारांना अपात्र घोषित करण्याबाबत उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी निवडणूक आयोगाचे मत मागविले आहे.
राज्य विधानसभेवर निवडून आल्यानंतरही कंत्राटदार म्हणून काम करीत असल्याबद्दल बसपाचे आमदार उमाशंकर सिंह आणि भाजपचे आमदार बहादूर सिंह यांना अपात्र ठरवावे, अशी शिफारस राज्याच्या लोकायुक्तांनी आपल्या अहवालात केली आहे.निवडणूक आयोगाने आपले मत राज्यपालांच्या कार्यालयास कळविले आहे. मात्र राम नाईक हे मुंबई दौऱ्यावरून परतल्यानंतर ९ जानेवारीनंतर निर्णय घेण्यात येणार आहे, असे राजभवनातील सूत्रांनी सांगितले. सदर दोन्ही लोकप्रतिनिधींचे कृत्य लोकप्रतिनिधी कायद्याचा भंग करणारे आहे, असे लोकायुक्तांनी आपल्या अहवालात म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले.