सध्या केंद्र सरकार करत असलेल्या आर्थिक संरचनात्मक सुधारणांमागे निश्चित विचार असून त्या अचानकपणे केलेल्या नाहीत. या सुधारणा शिस्तबद्ध, पूर्वनियोजित, समावेशक, एकमेकांशी जोडलेल्या आणि भविष्यकालीन लाभ देण्याऱ्या आहेत. पुढील काळातदेखील या सुधारणा केल्या जातील. त्यातून आर्थिक विकासाला पुन्हा गती मिळेल व देश आत्मनिर्भर बनवताना त्याचा फायदा जगाच्या अर्थकारणालाही होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवरी ‘सीआयआय’च्या कार्यक्रमात सांगितले.

जगभरात करोनाने थैमान घातले पण, त्याचा प्रकोप तुलनेत आपल्याला कमी करता आला कारण योग्यवेळी योग्य प्रतिबंधात्मक निर्णय घेतले गेले. करोनाविरोधातील लढय़ात टाळेबंदीचा मोठा फायदा झाला. आता टाळेबंदीचा परतीचा प्रवास सुरू झाला असून देश आर्थिक विकासाला गती देण्याकडे हळूहळू निघाला आहे. करोनाविरोधातील लढय़ासाठी कठोर पावले उचलावी लागली पण, आता आर्थिक विकासालाही तितकेच प्राधान्य द्यावे लागणार आहे. म्हणूनच केंद्र सरकारने दीर्घकालीन लाभाचे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आपण आर्थिक विकासाची पूर्वीची गती पुन्हा मिळवू यात कोणतीही शंका नाही, असा सकारात्मक विचार मोदींनी बोलून दाखवला.

हेतू, समावेशकता, गुंतवणूक, पायाभूत सुविधा आणि नव्या कल्पना या पाच मुद्दय़ांचा उल्लेख करत मोदी म्हणाले की, या पाच गोष्टींचा अवलंब करून देशाला आत्मनिर्भर बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याच पाच गोष्टींच्या आधारे धाडसी आर्थिक संरचनात्मक सुधारणा केल्या जातील. तुम्ही म्हणाल की, संकटाच्या काळात आर्थिक विकासाला गती मिळेल असे आत्मविश्वासाने कसे म्हणू शकता? पण, त्यासाठी अनेक कारणे असू शकतात. भारताकडे ती क्षमता आहे. संकटकालीन व्यवस्थापनही करता आले आहे. भारताकडे बौद्धिक क्षमता आहे, तंत्रज्ञान आहे. लोकांकडे नव्या कल्पना आणि त्या राबवण्याची क्षमताही आहे. देशातील शेतकरी, छोटे उद्योजक यांच्यावरही माझा विश्वास आहे, असे मोदी म्हणाले.

मोदींनी २० लाख कोटींच्या आर्थिक मदतीचाही उल्लेख केला. कोळसा, खनिज उत्खनन, अवकाश, औष्णिव ऊर्जा आदी क्षेत्रांमध्ये खासगी क्षेत्राला मिळणाऱ्या संधीचा लाभ कसा घेता येईल याचा कंपन्यांनी विचार केला पाहिजे, असे मोदी म्हणाले. जगाला भारताकडून मोठय़ा अपेक्षा आहेत. करोनाच्या काळात भारताने १५० देशांना औषधांचा पुरवाठा केला आहे.

जग भारतावर अवलंबून राहू लागले आहे. जगाच्या या अपेक्षा पूर्ण करण्याची ताकद व क्षमता आपल्याकडे आहे, असेही मोदी म्हणाले. केंद्र सरकार तुमच्या बरोबर आहे. तुम्ही एक पाऊल पुढे टाकले तर सरकार चार पावले टाकेल! करोनाच्या काळात पीपीईसारख्या वैद्यकीय सुविधांबाबत भारत आत्मनिर्भर बनला असे सांगत मोदींनी उत्पादन क्षेत्राचे कौतुक केले.

‘आत्मनिर्भर भारत’ जागतिक अर्थकारणालाही पोषक- रविशंकर प्रसाद

भारत मोबाइल फोननिर्मितीमध्ये जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश बनला आहे. २०१९-२० मध्ये देशातील मोबाइल फोननिर्मितीत सुमारे ३३ टक्के वाढ झाल्याची माहिती केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी मंगळवारी दिली. पूर्वी मोबाइल बनवणारे फक्त २ कारखाने होते, आता २०० आहेत. २०१४ मध्ये इलेक्ट्रॉनिक उत्पादनातील उलाढाल १ लाख ९० हजार ३६६ कोटी रुपये होती, आता ती ४ लाख, ५८ हजार कोटी रुपये इतकी झाली आहे. २०१२-१३ मध्ये जागतिक बाजारात इलेक्ट्रॉनिक उत्पादनांमध्ये भारताची हिस्सेदारी १.३ टक्के होती, २०१८मध्ये ती ३ टक्क्यांवर पोहोचली. ‘आत्मनिर्भर भारत’ धोरणांतून उत्पादन क्षेत्रासाठी पोषक वित्तीय वातावरण निर्माण करण्याचा केंद्र सरकार प्रयत्न करत असल्याचेही प्रसाद यांनी सांगितले. ‘आत्मनिर्भर भारत’ फक्त आपल्यापुरते मर्यादित नसेल, जागतिक अर्थकारणाला पोषक असेल, असेही प्रसाद म्हणाले.