प्रताप भानू मेहता यांच्या अशोका विद्यापीठातून बाहेर पडण्यामागील परिस्थिती आणि विद्यापीठाकडे व्यावसायिक स्थान आणि खासगी भांडवल असूनही शैक्षणिक अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळणार नाही या कारणांमुळे प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ अरविंद सुब्रमणियन यांनी अशोका विद्यापीठाचे प्राध्यापक म्हणून राजीनामा दिला आहे.

सुब्रमणियन यांनी गेल्या वर्षी जुलैमध्ये अशोका विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून प्रवेश केला होता. भारत आणि जागतिक विकासाशी संबंधित धोरणात्मक विषयांवर संशोधन करण्यास वाहून घेतलेल्या नवीन अशोका सेंटर फॉर इकॉनॉमिक पॉलिसीचे ते संस्थापक संचालक देखील आहेत.

मेहता निघून गेल्यानंतर दोनच दिवसानंतर सुब्रमणियन यांनी आपला राजीनामा दिला आहे. हा राजीनामा चालू शैक्षणिक वर्षाच्या अखेरीपासून लागू होईल, असे सुब्रमण्यम यांनी विद्यापीठाचे कुलगुरू मलाबिका सरकार यांना दिलेल्या पत्रात लिहिले आहे.

प्रताप भानू मेहता हे अशोका विद्यापीठातून बाहेर पडल्याची बातमी इंडियन एक्स्प्रेसने १७ मार्च रोजी सर्वप्रथम दिली होती. मेहता हे इंडियन एक्सप्रेसचे संपादक ( योगदान ) देखील आहेत. त्यांनी सतत त्यांच्या लेखांमध्ये आणि जाहीरपणे झालेल्या सभांमध्ये सत्ताधारी आस्थापनांवर प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. राजकारण आणि राजकीय सिद्धांत, घटनात्मक कायदा, शासन आणि राजकीय अर्थव्यवस्थेबद्दलच्या देशातील अग्रगण्य विद्वानांपैकी त्यांना एक मानले जाते. मंगळवारी जेव्हा इंडियन एक्स्प्रेसने त्यांना विचारले की, सरकारवरील त्यांच्या टीकांचे त्यांच्या विद्यापीठातून बाहेर पडण्याशी काही संबंध आहे का, तेव्हा या प्रश्नाकडे त्यांनी दुर्लक्ष केले.

तथापि, सुब्रमणियन यांनी राजीनामा पत्रात हे स्पष्ट केले की मेहता यांची गच्छंती ही शैक्षणिक अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे  संरक्षण करण्यात विद्यापीठाच्या असमर्थतेशी निगडित आहे. त्यांनी असेही लिहिले आहे की, मेहता यांच्या जाण्याने “अशोकाच्या दृष्टीकोनासाठी संघर्ष करण्याच्या आणि तो टिकवण्याच्या विद्यापीठाच्या वचनबद्धतेसमोर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे” आणि त्यामुळेच अशोकाचा भाग बनून राहणे त्यांना कठीण बनले आहे.