इक्बाल मिर्चीच्या दुबईतल्या २०० कोटींच्या १५ मालमत्ता ईडीने जप्त केल्या आहेत. यामध्ये एका हॉटेल अपार्टमेंटचाही समावेश आहे. तसंच १४ व्यापारी आणि निवासी इमारतींचा यामध्ये समावेश आहे. ANI ने यासंदर्भातले वृत्त दिले आहे. या मालमत्ता इक्बाल मिर्चीच्या नातेवाईकांच्या नावांवर आहेत. या १५ मालमत्तांची किंमत २०३.२७ कोटींच्या घरात आहे.

कोण होता इक्बाल मिर्ची ?
इक्बाल मिर्ची हा १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील प्रमुख आरोपींपैकी एक होता. १९९४ मध्ये सरकारने तडीपार केले होते. दाऊद टोळीचा अंमली पदार्थांचा बाजार तो सांभाळत असे.त्याला पकडण्यासाठी इंटरपोलने नोटीसही जारी केली होती. १९९५ मध्ये तो विदेशात पळून गेला. ऑगस्ट २०१३ मध्ये इक्बाल मिर्चीचा लंडनमध्ये मृत्यू झाला.

मुंबईत इक्बाल आणि त्याच्या कुटुंबीयांच्या पाच मालमत्ता आहेत. खंडाळ्यात सहा एकर जमीन मेसर्स व्हाइटच्या नावावर आहे. त्याचा ताबा इक्बालच्या दोन मुलांकडे आहे. मुंबईतील साहिल बंगलो इक्बालची पत्नी आणि मुलाच्या नावावर आहे. वरळीतील समंदर महल येथील मालमत्ता इक्बालची बहीण व मेहुण्याच्या ताब्यात आहे. या सगळ्या मालमत्तेची किंमत कोट्यवधी रुपये आहे. इक्बाल मिर्ची याची दुबई येथे असलेल्या पंधरा मालमत्तांवर आता ईडीने टाच आणली आहे.