श्रीनगरमध्ये घडत असलेल्या गूढ घटनांच्या मालिकेत, शहरातील एका आलिशान बाजारपेठेत मध्यरात्री आग लावण्याचा प्रयत्न थोडक्यात टळल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जम्मू- काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्यात आल्यानंतर करण्यात आलेले अघोषित बंदचे आवाहन झुगारणाऱ्या दुकानदारांना लक्ष्य करण्यात येत असल्याचा प्रशासनाला संशय आहे.

रविवारी उशिरा मध्यरात्री, रेसिडेन्सी रोडवरील लँबर्ट लेन मार्केटमधील काही दुकानांवर एक ज्वालाग्राही पदार्थ शिंपडण्यात आला, मात्र दक्ष असलेल्या इमारतीतील रहिवाशांनी या दुकानांना आग लावण्याचा प्रयत्न हाणून पाडला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

रविवारी उशिरा रात्री आम्हाला इमारतीभोवती पेट्रोलचा वास आल्यामुळे आम्ही काय ते शोधण्यासाठी खाली उतरलो. तेथे कुणीही नव्हते, मात्र काही दुकानांवर इंधन शिंपडण्यात आल्याचे दिसून आले, असे इमारतीच्या एका रहिवाशाने सांगितले. आम्ही याबाबत बाजार संघटनेच्या सदस्यांना कळवल्यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली, असे तो म्हणाला. गेल्या तीन रात्री घडलेली ही अशा प्रकारची तिसरी घटना आहे. यापूर्वी शनिवारी रात्री, अतिशय संरक्षित अशा आखाडा इमारतीच्या अगदी समोर असलेल्या बुदशाह चौकात आणि त्यापूर्वीच्या रात्री हरीसिंह स्ट्रीटनजीक गोनी खान येथे असेच प्रकार घडले होते.

दरम्यान, जम्मू- काश्मीरच्या रामबन जिल्ह्य़ात काही ‘संशयास्पद हालचाली’ दिसून आल्याचे स्थानिक रहिवाशांनी कळवल्यानंतर सुरक्षा दलांनी सोमवारी या भागात शोधमोहीम हाती घेतली. रामबनच्या जंगल भागात शोधमोहीम राबवल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

काश्मीरमधील स्थितीबाबत पाकिस्तानचा कांगावा

कोलंबो : पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी सोमवारी येथे श्रीलंकेचे अध्यक्ष गोताबाय राजपक्ष यांची सोमवारी येथे भेट घेतली आणि त्यांच्याशी द्विपक्षीय व्यापार, गुंतवणूक आदी प्रश्नांबाबत चर्चा केली. त्यापूर्वी कुरेशी यांनी श्रीलंकेचे परराष्ट्रमंत्री दिनेश गुणवर्धने यांची भेट घेऊन त्यांना काश्मीरमधील स्थिती भयंकर आहे, असा कांगावाही केला. या वेळी कुरेशी यांनी पाकिस्तानचे अध्यक्ष आरिफ अल्वी यांचे पत्र राजपक्ष यांच्याकडे सुपूर्द केले. राजपक्ष यांना अल्वी यांनी पाकिस्तान भेटीचे निमंत्रण दिले आहे, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाकडून सांगण्यात आले.

लेहमध्ये तापमान उणे १४.४ अंश सेल्सिअस

लेह आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये कडाक्याची थंडी पडली असून सोमवारी लडाखमध्ये उणे १४.४ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली, तर लेहची सर्वात थंड ठिकाण म्हणून नोंद करण्यात आली. श्रीनगरमध्ये रात्री उणे २.५ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. गुलमर्गमधील प्रसिद्ध स्की रिसॉर्ट येथे गेल्या महिन्यात अनेकदा बर्फवृष्टी झाली तेथे उणे ७.० अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. तथापि, सोमवारी सकाळी जम्मू आणि काश्मीरमध्ये ऊन पडले होते. पहलगाम येथे उणे ५.८ अंश सेल्सिअस, तर कुपवाडामध्ये उणे ३.७ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. जम्मूमध्ये ८.० अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली. तर कतरा येथे ७.० अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली.