इजिप्तच्या संसदेतील वरिष्ठ सभागृहाने संमत केलेले दोन कायदे रद्दबातल ठरवून सर्वोच्च न्यायालयाने रविवारी सत्तारूढ इस्लामी गटास जबरदस्त धक्का दिला आहे. याखेरीज क्रांतीनंतर निवडून आलेल्या ज्या संसदेने संबंधित कायद्याचा मसुदा तयार केला, ती संसदच बेकायदा असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
इस्लामींचे प्राबल्य असलेल्या शुरा कौन्सिलच्या सदस्यांची निवडणूक घटनाबाह्य़ असल्याचे सांगून घटनात्मक संसदेच्या सदस्यांची निवड करण्यासाठी ठरविण्यात आलेले निकषही घटनेस धरून नसल्याचा निकाल न्यायालयाने दिला. नव्या संसदेची निवड होईपर्यंत कौन्सिलने स्वस्थ राहावे, असे न्या. महेर-अल बेहारी यांनी नमूद केले.