पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुकीसाठी आठ टप्प्यांत मतदान घेण्यात येणार असल्याचे शुक्रवारी निवडणूक आयोगाने जाहीर केले, त्यावर राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भाजपच्या निवडणूक प्रचाराचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने व्हावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या सूचनेवरून मतदानाच्या तारखा घोषित करण्यात आल्या असाव्यात, असा संशय ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला आहे.

निवडणूक आयोगाने राज्याकडे भाजपच्या दृष्टिकोनातून पाहू नये, असे ममता यांनी आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. अन्य राज्यांमध्ये केवळ एकाच टप्प्यात मतदान होणार असताना पश्चिम बंगालमध्ये अनेक टप्प्यांत मतदान का घेण्यात येणार आहे, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत, असे निवडणूक आयोगाचा आदर राखून आपल्याला म्हणावयाचे आहे, असे त्या म्हणाल्या. जर निवडणूक आयोगाने जनतेला न्याय दिला नाही तर जनता कोठे जाणार, असेही मुख्यमंत्री म्हणाल्या.

भाजपला ज्या दिवशी मतदान व्हावे असे वाटते त्याच दिवशी मतदानाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत अशी आपली माहिती आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या सूचनेवरून तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत का? पंतप्रधान आणि गृहमंत्री राज्यातील निवडणुकीसाठी आपल्या अधिकारांचा गैरवापर करू शकत नाहीत, असेही मुख्यमंत्री म्हणाल्या. या सर्व युक्त्या योजण्यात येत असल्या तरी निवडणुकीत आपलाच विजय निश्चित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

आयोगाची भाजपला मदत : तारिक अन्वर

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आठ टप्प्यांत मतदान घेण्यात येणार असल्याचे शुक्रवारी निवडणूक आयोगाने जाहीर केले त्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तारिक अन्वर यांनी टीका केली आहे. निवडणूक आयोग भाजपला मदत करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप अन्वर यांनी केला आहे.

निवडणूक जाहीर होण्याआधी वेतनवाढीची घोषणा

पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होण्यापूर्वी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी राज्याच्या शहरी रोजगार योजनेअंतर्गत काम करणाऱ्या कामगारांच्या दैनंदिन वेतनात वाढ करण्याची घोषणा केली.

आता अकुशल कामगारांना दररोज १४४ ऐवजी २०२ रुपये वेतन मिळेल तर निमकुशल कामगारांना १७२ ऐवजी ३०३ रुपये वेतन मिळणार आहे. रोजगार योजनेअंतर्गत सरकारने कुशल कामगारांसाठी नवी वर्गवारी तयार केली असून त्यांना आता दररोज ४०४ रुपये वेतन मिळणार आहे, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले. या घोषणेचा लाभ ४० हजार ५०० अकुशल, आठ हजार निमकुशल आणि आठ हजार कुशल कामगारांना होणार आहे.