राज्यातील विरोधी पक्षांची मागणी

पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या निवडणुका पाच ते सात टप्प्यांमध्ये घ्याव्या, अशी विनंती पश्चिम बंगालमधील विरोधी पक्षांनी मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांना केली आहे.
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक आयोगाच्या पूर्णपीठाने गुरुवारी सर्व राजकीय पक्षांशी सविस्तर चर्चा केली. पुढील वर्षी पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.
निवडणुका मुक्त आणि मोकळ्या वातावरणात पार पडाव्या आणि मतदारांना निर्भयपणे मतदान करता यावे यासाठी सर्व ती खबरदारी घेण्याची विनंती या वेळी आयोगाला करण्यात आली. मतदान किती
टप्प्यांत घ्यावे हे आम्ही सुचविले नाही, असे माकपचे नेते रवीन देव यांनी सांगितले. मात्र फॉरवर्ड ब्लॉकने मतदान सहा टप्प्यांत घेण्याची मागणी केली.
काँग्रेसच्या शिष्टमंडळानेही आयोगाच्या सदस्यांची भेट घेतली आणि मतदान पाच ते सहा टप्प्यांत घेण्याची मागणी केली. तर भाजपने सात टप्प्यांत मतदान घेण्याची मागणी केली.
दरम्यान, सर्व वैध मतदारांची नावे मतदारयादीत समाविष्ट करून ती यादी ५ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्याची मागणी सत्तारूढ तृणमूल काँग्रेसने केली.