केंब्रिज अॅनालिटिका प्रकरणानंतर सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. अमेरिकन उद्योग सम्राट इलॉन मस्क यांनी त्यांच्या ‘स्पेस एक्स’ आणि इलेक्ट्रीक कार तयार करण्याऱ्या ‘टेस्ला’ या कंपन्याचे फेसबुकवरील पेज बंद केले आहेत.

केंब्रिज अॅनालिटिका प्रकरणानंतर ट्विटरवर एका युजरने इलॉन मस्क यांना फेसबुकवरील ‘स्पेस एक्स’चे अधिकृत पेज बंद करण्याचे आव्हान दिले होते. मस्क यांनी देखील काही वेळातच फेसबुकवरील पेज बंद करुन फेसबुकला दणका दिला. ‘आम्ही फेसबुकसोबत कधीही जाहिरात केलेली नाही. आमची खोटी जाहिरात करण्यासाठी आम्ही कोणाला सांगत नाही किंवा आम्ही त्यासाठी कोणाची सेवा घेत नाही. माझ्या कंपन्यांची सर्व उत्पादने ही त्यांच्या दर्जामुळेच चालतात, असे त्यांनी सांगितले. फेसबुकवरील पेज डिलिट केल्याने कंपनीला मोठा फटका बसेल असे काही नाही, असंही मस्क यांनी म्हटले आहे. मस्क यांच्या ‘स्पेस एक्स’च्या फेसबुकवरील पेजला लाखो युजर्सनी लाईक केले होते.

केंब्रिज अॅनालिटिकाप्रकरणानंतर एखाद्या कंपनीने फेसबुकवरील पेज बंद करण्याची ही पहिलीच घटना आहे. फेसबुकसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

दोन दिवसांपूर्वीच मार्क झुकेरबर्गने फेसबुकवरुन या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले होते. फेसबुकच्या खातेदारांच्या विश्वासाला तडा गेला आहे. अशी चूक पुन्हा होणार नाही. माहितीची गोपनीयता कायम राखण्यासाठी पावले उचलली जातील, मी तांत्रिक चूक केलीच, पण व्यावसायिकही चूक केली, असे झुकेरबर्गने म्हटले होते. मी चुकीच्या लोकांना कामावर ठेवले. आता फेसबुकचा वापर करणाऱ्या प्रत्येक अॅपची तपासणी केली जाईल, असे आश्वासन झुकेरबर्गने दिले होते.