करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कठोर टाळेबंदी लागू करण्याचा केंद्र सरकारने केलेला प्रयत्न यशस्वी झालेला नाही. करोनाचा विषाणू अजूनही नष्ट झालेला नाही; पण या खटाटोपात देशाची अर्थव्यवस्था मात्र नष्ट झाली, अशी परखड टिप्पणी ‘बजाज ऑटो’चे व्यवस्थापकीय संचालक-उद्योजक राजीव बजाज यांनी केली.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी राजीव बजाज यांच्याशी संवाद साधला. दोघांच्या संभाषणात बजाज म्हणाले की, करोनाच्या महासाथीचा आलेख खाली आणताना केंद्र सरकारने आर्थिक विकासाचाही आलेख खाली आणला आहे. केंद्र सरकारच्या टाळेबंदीच्या धोरणामुळे करोनाचा वाढता धोका आणि घसरलेली विकासाची गती अशा एकाच वेळी दोन्ही संकटांत देशाला सामोरे जावे लागले आहे.

टाळेबंदीचा उल्लेख ‘राक्षसी’ असा करत बजाज म्हणाले, जागतिक युद्धातसुद्धा अशी टाळेबंदी नव्हती. अन्य कुठल्याही देशात अशा रीतीने टाळेबंदी लागू केल्याचे मी ऐकलेले नाही. खरे तर टाळेबंदी भुसभुशीत होती. त्यामुळे करोनाचा विषाणू अस्तित्वात आहे. टाळेबंदी पूर्ण काढून टाकली की, विषाणूचा प्रादुर्भाव वाढणार आहे. याचा अर्थ आपण टाळेबंदी करूनदेखील समस्या सोडवलेली नाही. करोनाबद्दलचे लोकांच्या मनातील भय काढून टाकून त्यांना ठोस दिशा देण्याची गरज आहे. हे काम फक्त पंतप्रधानच करू शकतात!

अर्थव्यवस्थेला चालना देण्यासंदर्भात ते म्हणाले की, जपान, अमेरिका या देशांमध्ये प्रतिव्यक्ती एक हजार डॉलरची थेट मदत दिली गेली. हा पैसा प्रोत्साहन निधी नव्हता. तिथे सरकारने दिलेल्या दोनतृतीयांश कामांतून संस्था, संघटनांना व व्यक्तींना थेट लाभ मिळाला आहे. हे प्रमाण भारतात फक्त १० टक्के असल्याचे सांगितले जाते. आपल्याकडे थेट मदत का दिली गेली नाही?

सहिष्णुता व संवेदनशीलता हीच ताकद!

बजाज म्हणाले की, आत्ता देशात उघडपणे न बोलण्याचे वातावरण आहे; पण नोव्हेंबरमध्ये माझ्या वडिलांनी केंद्रीय गृहमंत्री आणि केंद्रीय अर्थमंत्र्यांसमोर हाच मुद्दा उपस्थित केला होता. देशात १०० लोक बोलण्याचे धाडस करत नसतील तर त्यापैकी ९० लोकांकडे लपवण्याजोगे काही तरी आहे. काही लोकांना उघडपणे बोलायचे नसते, कारण त्यानंतर उद्भवू शकणाऱ्या प्रतिक्रियांना त्यांना सामोरे जाण्याची हिंमत नसते. तुलनेत मीही याच श्रेणीत येतो. म्हणून तर मी समाजमाध्यमांवर नाही. सहिष्णुता व संवेदनशीलता ही आपल्या देशाची ताकद असून ती आपण गमावू नये!

आता हेदेखील बोलायचे नाही का?

राहुल गांधींशी कशाला बोलत आहेस, तू अडचणीत येशील. प्रसारमाध्यमांशी बोलणे वेगळे आणि राहुल गांधींशी बोलणे यात फरक आहे हे लक्षात घे, असा सल्ला मला माझ्या मित्राने दिला होता, असे राजीव बजाज यांनी सांगितले. मी मित्राला सांगितले, व्यापार, अर्थकारण, टाळेबंदी या विषयांवर आम्ही बोलणार आहोत. राहुल गांधींना मोटारसायकलींबद्दल प्रेम आहे म्हणून आम्ही त्यावरही बोलणार आहोत. आता हेदेखील बोलायचे नाही का? तरी कशाला धोका पत्करतोस, असा मित्राने पुन्हा सल्ला दिला, असे बजाज म्हणाले.