अमेरिकेतील भारतीय राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे यांच्यावर व्हिसा अर्जात दिलेल्या माहितीनुसार मोलकरणीस वेतन न दिल्याप्रकरणी खटला चालवला जाईल, त्यात माघार घेतली जाणार नाही असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. अमेरिकी सूत्रांनी सांगितले, की खोब्रागडे यांच्याविरुद्ध खटला दाखल करण्यासाठी आमच्याकडे अनेक पुरावे आहेत व आरोपपत्र दाखल करण्यासाठी १३ जानेवारी ही अंतिम मुदत आहे. न्यूयॉर्कमध्ये उप महा वाणिज्यदूत म्हणून काम करीत असलेल्या देवयानी खोब्रागडे यांना १२ डिसेंबर रोजी अटक करून अडीच लाखांच्या जामिनावर त्यांना सोडण्यात आले होते. त्यांना हातकडय़ा घालून मानहानिकारक वागणूक देण्यात आल्याने भारत सरकारने त्यावर प्रतिक्रियात्मक पावले उचलली होती. भारताचे राजदूत एस. जयशंकर यांनी अलीकडेच अमेरिकी अधिकाऱ्यांची भेट घेऊन देवयानी यांच्यावरील आरोप मागे घेण्याची मागणी केली होती. सूत्रांनी सांगितले, की देवयानी यांच्यावर खटला चालवला जाईल. त्यांच्यावरचे आरोप निश्चित केले जातील. देवयानी खोब्रागडे यांच्यावर जी कारवाई करण्यात आली ती नियमानुसार करण्यात आली असून, त्यात कुठलाही कुटिल हेतू नव्हता.
खोब्रागडे यांची बदली संयुक्त राष्ट्रातील भारतीय दूतावासात करण्यात आली आहे त्यामुळे त्यांना पूर्वलक्ष्यी प्रभावाने खटल्याच्या कारवाईपासून सुरक्षितता मिळणार का, या प्रश्नावर नकारार्थी उत्तर देण्यात आले. त्यांना संयुक्त राष्ट्रांकडून संरक्षण मिळणार असेल तर त्यांच्यावर खटला भरता येणार नाही. हे प्रकरण तूर्त स्थगित केले असले तरी निकाली काढण्यातच आलेले नाही. जर त्यांना संयुक्त राष्ट्रांमध्ये काम करीत असल्याने कारवाईतून सुटका मिळाली व त्या काळात त्या भारतात गेल्या व परत अमेरिकेत आल्या तरी त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.