जर्मनी, इटली आणि पाकिस्तान या देशांतील भारतीय दुतावासांत काम केलेल्या देवयानी खोब्रागडे यांच्या अटकेचे तीव्र पडसाद भारतात उमटले आहेत. मात्र, घरात कामासाठी ठेवलेल्या मोलकरणीला अमेरिकेतील वेतनश्रेणीनुसार पगार न देता अत्यल्प रकमेत राबवल्याचे हे प्रकरण त्यांना चांगलेच भोवण्याची चिन्हे आहेत.
खोब्रागडे यांच्या न्यूयॉर्कमधील घरात नोव्हेंबर २०१२ ते जून २०१३ या काळात मोलकरणीचे काम करणाऱ्या संगीता रिचर्ड हिने केलेल्या तक्रारीवरून खोब्रागडे यांना अटक करण्यात आली. खोब्रागडे यांच्याविरोधात मॅनहटनमधील न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या अकरा पानी तक्रारीनुसार, खोब्रागडे यांनी रिचर्ड हिचे वेतन आणि कामाचे नियम यासंदर्भात व्हिसा अर्जामध्ये चुकीची माहिती दिल्याचे स्पष्ट झाले आहे. खोब्रागडे या ज्या भागात राहतात तेथे घरकामगारांच्या रोजगाराचा दर ताशी ९.७५ डॉलर इतका आहे. मात्र खोब्रागडे यांनी संगीता रिचर्ड हिला ताशी ३.३१ डॉलर इतके वेतन देत होत्या. रिचर्ड हिला दरमहा ४५०० डॉलर इतके वेतन देण्याचे व्हिसा अर्जात कबूल केले असताना खोब्रागडे या ६०० डॉलरपेक्षा कमी वेतन देत होत्या, असा त्यांच्यावर आरोप आहे. संगीता रिचर्ड हिला त्यांनी भारतातून तेथे आणले होते. त्यावेळी तिला दरमहा ३० हजार रुपये देण्याचे खोब्रागडे यांनी कबूल केले होते. अमेरिकी चलनानुसार हे वेतन दरमहा ५७३.०७ डॉलर इतके होते. मात्र, व्हिसासाठी अर्ज भरताना खोब्रागडे यांनी संगीता हिला ‘आपल्याला दरमहा ४५०० डॉलर दिले जातील’ असे सांगण्यास सांगितले होते. घरगुती नोकरांना ए-३ व्हिसावर परदेशात नेता येते. मात्र, त्यांना अमेरिकेच्या नियमानुसारच वेतन मिळाले पाहिजे, असे मॅनहटन न्यायालयाचे न्या. प्रीत भरारा यांनी म्हटले आहे.