रोम : युरोपीय समुदायाने कोविड १९ प्रतिबंधक लसीकरण वेगाने सुरू केले असून त्यासाठी समन्वयाने संपूर्ण आखणी करण्यात आली आहे. एकूण ४५ कोटी लोक हे जोखमीच्या गटात असून युरोपात आता करोनाप्रतिबंधाबाबत आशेचा किरण निर्माण झाला आहे. आरोग्य कर्मचारी, वयस्कर व्यक्ती व राजकारणी यांना २७ युरोपीय देशात पहिल्यांदा लस देण्यात येत आहे.

लस सुरक्षित आहे हे दाखवून देण्यासाठी राजकीय नेते ती टोचून घेत आहेत. माटेई बाल्स इन्स्टिटय़ूट या बुखारेस्टमधील आरोग्य संस्थेत एका परिचारिकेला लस देण्यात आली. मिहेला अँघेल हिने सांगितले की, रोमानियात पहिली लस मला दिली जात आहे याचा आनंद आहे. घाबरू नका, डोळे उघडे ठेवून ही लस घ्या. रोममध्ये पाच डॉक्टर व परिचारिका यांनी स्पॅलानझानी संसर्गजन्य रोग रुग्णालयात लस घेतली. डॉ. मारिया रोझारिया कॅपोबियानशी यांनी सांगितले की, ही लस आशेचा संदेश घेऊन आली आहे. डॉ. मारिया या विषाणुशास्त्र प्रयोगशाळेच्या प्रमुख आहेत.

इटलीचे डोमेनिको अरकुरी यांनी सांगितले की, इटलीत पहिली लस देण्यात आली हे चांगले झाले. वुहानमधून आलेल्या एका जोडप्याला पहिल्यांदा करोना विषाणूची बाधा  झाली  होती.  त्यानंतर लोम्बार्डी येथे करोनाने थैमान घातले होते. इटलीत एकूण ७२ हजार बळी करोनाने घेतले होते.

झेकोस्लोव्हाकियात सुरुवातीला साथीने धोका  दिला नाही पण नंतरच्या काळात करोनाचे रुग्ण वाढून तेथील आरोग्य यंत्रणा कोलमडली, असे झेकोस्लोव्हाकियाचे पंतप्रधान अँड्रेज बॅबीस यांनी सांगितले. त्यांनी रविवारी लस घेतली. आता काळजी करण्याचे कारण नाही असे त्यांनी स्पष्ट केले.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील बुजुर्ग एमिली रेपीकोवा यांनाही लस देण्यात आली. त्या व्हील चेअरवर आल्या होत्या. युरोपातील २७ देशात १.६० कोटी लोकांना करोनाचा संसर्ग झाला होता व त्यात ३ लाख ३६ हजार बळी गेले होते.