इस्लामाबाद : पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांनी अधिसूचित केलेल्या दहशतवादी संघटनांवरच नव्हे तर पुलवामातील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेणाऱ्या जैश ए महंमद व त्यांच्या म्होरक्यांवर कठोर व शाश्वत स्वरूपाची कारवाई करावी, असे युरोपीय समुदायाने म्हटले आहे.
पुलवामा येथे १४ फेब्रुवारी रोजी करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे ४० जवान हुतात्मा झाल्याच्या घटनेनंतर जैश ए महंमद या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. युरोपीय समुदायाच्या परराष्ट्र कामकाज प्रतिनिधी फेडेरिका मोघेरिनी यांनी पाकिस्तान व भारत या दोन्ही देशांना हल्ल्यानंतर निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचेही सुचवले आहे.
पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री यांच्याशी त्या रविवारी दूरध्वनीवर बोलल्या व त्यांच्याशी सध्याच्या परिस्थितीवर चर्चा केली, असे युरोपीय समुदायाच्या प्रतिनिधी मंडळाने निवेदनात म्हटले आहे. युरोपीय समुदायाने या बाबत भारताशीही संपर्क साधला आहे. मोघेरिनी यांनी दहशतावादाचा प्रश्न शाश्वत व स्पष्ट कृतीच्या माध्यमातून हाताळण्याचे आवाहन केले असून, संयुक्त राष्ट्रांनी अधिसूचित केलेले दहशतवादी गटच नव्हे तर पुलवामा हल्ल्याची जबाबदारी घेणारी दहशतवादी संघटना व त्यांचे म्होरके यांच्यावर कारवाई करावी अशी अपेक्षा युरोपीय समुदायाने व्यक्त केली आहे.
फेडेरिका मोघेरिनी यांनी सांगितले, की युरोपीय समुदायाचे धोरण हे नेहमीच भारत-पाकिस्तान यांच्यातील मतभेद मिटवण्यासाठी संवाद सुरू करण्याला प्रोत्साहन देणारे आहे.
सरकारने जवानांना मरू दिले- ममता बॅनर्जी
कोलकाता : मोदी सरकारने गुप्तचरांनी दिलेल्या माहितीची गांभीर्याने दखल न घेता केवळ या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांवर राजकारण केले, असा घणाघाती आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेस समितीच्या बैठकीत सांगितले, की हुकूमशहा नरेंद्र मोदी यांचे सरकार आगामी निवडणुकीत लोकांनी सत्तेवरून घालवावे. तृणमूल काँग्रेस पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या सर्व ४२ जागा जिंकेल, असा विश्वास व्यक्त करून त्या म्हणाल्या, की असा हल्ला होऊ शकतो हे केंद्र सरकारला माहिती होते. त्याची गुप्तचर माहितीही मिळालेली होती. मग सरकारने जवानांचे प्राण वाचवण्यासाठी कृती का केली नाही, सरकारने यावर राजकारण करून जवानांना मरू दिले. १४ फेब्रुवारी रोजी काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्य़ात करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे ४० जवान हुतात्मा झाले. या हल्ल्याची जबाबदारी जैश ए महंमद या संघटनेने घेतली आहे.
‘युद्धज्वर निर्माण करण्याचा सरकारचा हेतू’
लोकसभा निवडणुकीपूर्वी युद्धज्वर निर्माण करण्याचा सरकारचा यात हेतू होता. केंद्र सरकार वाईट पद्धतीने काम करीत आहे. मंत्र्यांना महत्त्वाच्या निर्णयांची माहिती नाही. सरकार नरेंद्र मोदी व अमित शहा चालवत आहे, त्यांचे हात निरपराधांच्या रक्ताने माखलेले आहेत. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात लोकसभा निवडणुकीच्यावेळी फेरफार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, त्यापासून तृणमूल कार्यकर्त्यांनी सावध राहिले पाहिजे. आपण हे प्रयत्न हाणून पाडले पाहिजेत.