देशात वारंवार समोर येत असलेल्या बलात्काराच्या घटनांवर प्रतिक्रिया देताना उत्तर प्रदेश सरकारमधील एका मंत्र्याने अजब विधान केले आहे. “समाजातील गुन्हे रोखण्याची गॅरंटी प्रभू रामानेही दिली नसेल,” असे अन्न पुरवठा राज्यमंत्री रणवेंद्र प्रताप सिंह ऊर्फ धुन्नी सिंह यांनी म्हटले आहे. या विधानामुळे वाद होण्याची चिन्हे आहेत.

बलात्काराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यावर प्रतिक्रिया देताना धुन्नी सिंह म्हणाले, “जर समाज आहे तर समाजातून शंभर टक्के गुन्हे संपतील असे म्हणता येणार नाही. कारण, खुद्द प्रभू रामानेही अशी गॅरंटी कधी दिली नसेल. त्यामुळे शंभर टक्के गुन्हे संपतील याची नव्हे तर गुन्हा करणारी व्यक्ती तुरुंगात जाईल आणि त्याला कठोरात कठोर शिक्षा होईल याची गॅरंटी जरुर देता येईल.”

उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये एक २० वर्षीय बलात्कार पीडित तरुणी गुरुवारी पहाटे पाच वाजता रायबरेलीला जाण्यासाठी रेल्वे स्थानकाकडे निघालेली असताना पाच जणांनी तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले होते. यामध्ये ती ९० टक्के भाजली असून तिची प्रकृती गंभीर आहे. या पीडितेला एअर अॅम्ब्युलन्सने दिल्लीतील रुग्णालयात उपचारांसाठी हालवण्यात आले आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या पीडितेवरील उपचारांचा सर्व खर्च सरकार करणार असल्याचे जाहीर करीत आरोपींवर कडक कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. या प्रकरणातील पाचही आरोपींना अटक करण्यात आली आहे.