काँग्रेस पक्षाच्या सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत टीकाटिप्पणी करणारा लेख प्रसिद्ध केल्याबद्दल पक्षाने मुंबईस्थित राष्ट्रीय प्रवक्ते संजय झा यांना पदावरून मंगळवारी हटवलं होतं. त्यानंतर झा यांनी पुन्हा एकदा कांग्रेसवर निशाणा साधला आहे. माजी पंतप्रदान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा उल्लेख करत झा यांनी काँग्रेसवर निशाणा साधला.

“एकदा पंडित नेहरू यांनी स्वत:च्या विरोधात एका वृत्तपत्रात टीका करत सरकारला हुकुमशाहीकडे जात असल्याचं म्हणत इशारा दिला. लोकशाही, उदारमतवादी, सहनशील अशी सर्वांना एकत्र घेऊन जाणारी काँग्रेस खरी काँग्रेस आहे. आम्ही ती मूल्ये मागे ठेवली आहेत. का? तरीही पक्षाचा एक निर्भय सैनिक,” असं म्हणत झा यांनी काँग्रेसला नेहरूंनी स्वत:वर केलेल्या टीकेची आठवण करून दिली,

दरम्यान, पक्षाने दिलेल्या माहितीनुसार अभिषेक दत्त आणि साधना भारती यांची कॉंग्रेसचे राष्ट्रीय माध्यम पॅनेलचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे नुकत्याच एका लेखाच्या माध्यमातून झा यांनी पक्षाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. पक्षात अंतर्गत लोकशाहीची कमतरता असल्याचं त्यांनी नमूद केलं होतं. दुसरीकडे कॉंग्रेसने कर्नाटक विधान परिषद निवडणुकीसाठी बीके हरी प्रसाद आणि नसीर अहमद यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

मुंबईतील संजय झा हे पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते होते व वृत्तवाहिन्यांवर पक्षाची भूमिका मांडत असत. राहुल गांधी यांचा पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षाची सध्याची राजकीय परिस्थिती, पक्षाच्या ध्येयधोरणांमध्ये बदलाची आवश्यकता यावर झा यांनी एका इंग्रजी वृत्तपत्रात दोन लेख लिहिले होते. यावरून पक्षाच्या नेत्यांनी झा यांच्यावर टीका केली होती.