भाजपात प्रवेश केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भारताचा माजी फूटबॉलपटू मेहताब हुसैन यांनी आपण कोणत्याही पक्षाशी संबंधित नसल्याचं म्हटलं आहे. कोलकातामध्ये ‘मिडफिल्ड जनरल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेहताब हुसैन यांनी आपण राजकारण सोडत असून हा आपला वैयक्तिक निर्णय असल्याचं सांगितलं आहे. आपण भाजपात प्रवेश केल्यानंतर आपल्या कुटुंबीय आणि शुभचिंतकांनी व्यक्त केलेल्या भावना पाहून आपल्याला खूप धक्का बसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

मेहताब हुसेन यांनी बुधवारी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला होता. मेहताब हुसेन यांच्या हाती यावेळी भाजपाचा झेंडा देत ‘भारत माता की जय’ घोषणा देण्यात आल्या. पण प्रवेश केल्याच्या दुसऱ्याच दिवशी मेहताब हुसेन यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत, “आपण सध्याच्या घडीला कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही. मी घेतलेल्या निर्णयाबद्दल शुभचिंतकांची माफी मागतो,” असं म्हटलं आहे.

“हा निर्णय घेण्यासाठी आपल्यावर कोणीही जबरदस्ती केलेली नाही. राजकारणापासून दूर राहण्याचा हा आपला वैयक्तिक निर्णय आहे,” असं मोहताब हुसेन यांनी स्पष्ट केलं आहे. भारताकडून ३० फूटबॉल सामने खेळणाऱ्या आणि दोन गोल करणाऱ्या मेहताब हुसेन यांनी आपल्याला जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं असल्याने राजकारणात प्रवेश करत असल्याचं सांगितलं होतं.

मेहताब हुसेन यांनी २०१८-१९ मध्ये फुटबॉल खेळणं सोडलं. आपण राजकारणात प्रवेश करण्याच्या निर्णयाने आपली बायको आणि मुलंही दुखावल्याचं त्यांनी सांगितलं आहे. “माझी पत्नी आणि मुलं कोणीही माझ्या या निर्णयाला पाठिंबा दिला नाही. माझ्या मित्र आणि समर्थकांप्रमाणे तेदेखील या निर्णयामुळे दुखावले होते. त्यांच्या दुखी चेहऱ्याकडे पाहून माझ्या मनाला खूप मोठा धक्का बसला,” असं मेहताब यांनी सांगितलं आहे.

भाजपाने मात्र टीएमसीकडून धमक्या मिळत असल्याने मेहताब हुसेन यांनी हा यु-टर्न घेतला असल्याचं म्हटलं आहे. “हा टीएमसीचं धमकावून घाबरवण्याचं राजकारण आहे. आम्ही याआधीही अशा गोष्टी पाहिल्या आहे. पण यामुळे टीएमसी आपला जनाधार गमावणा आहे,” असं भाजपाचे सरचिटणीस बासू यांनी सांगितलं आहे. टीएमसीने हे आरोप फेटाळले आहेत.