प्रियकराला एकांतातल्या क्षणांचा व्हिडिओ बनवण्याची परवानगी देणे एका २४ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीला चांगलेच महाग पडले आहे. पूर्व बंगळुरुमध्ये राहणाऱ्या सदर तरुणीला तिचा पूर्व प्रियकर आता याच फोटो आणि व्हिडिओवरुन ब्लॅकमेल करत असून तिच्याकडे काही लाख रुपयांची मागणी केली आहे. पैसे दिले नाहीत तर त्याने सर्व फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी दिली आहे.

आरोपीने युटयूबवर व्हिडिओ अपलोड करु नये म्हणून तरुणीने आरोपीला ५० हजार रुपयेही दिले आहेत अशी माहिती जीवन बीमा नगर पोलिसांनी दिली. जेव्हा आरोपीने पुन्हा तिच्याकडे साडेचार लाख रुपयांची मागणी करुन १७ जून पर्यंतची मुदत दिली तेव्हा तिने पोलिसात तक्रार दाखल केली.

केएम मुरुगेश असे आरोपीचे नाव असून तो डोमलूरचा रहिवाशी असून एका खासगी कंपनीत नोकरी करतो. तो आणि पीडित तरुणी आठवर्षांपासून परस्परांना ओळखत होते. ओळखीतून मैत्री पुढे मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांमध्ये अनेकवेळा शरीरसंबंध प्रस्थापित झाले. मुरुगेशने दोघांच्या खासगी क्षणांचे कॅमेऱ्यात रेकॉर्डिंग केले. मुलीच्या कुटुंबियांनी मुरुगेशच्या चारित्र्यबद्दल संशय व्यक्त केल्यानंतर तिने प्रेमसंबंध तोडले.

त्यानंतर मुरुगेशने त्याच्याकडे असलेल्या फोटो आणि व्हिडिओवरुन संबंधित तरुणीला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. त्याने त्याच्या मोबाईलमधील फोटो आणि व्हिडिओ डिलीट करण्यासाठी पाच लाख रुपये मागितले. पीडित तरुणीने भितीपोटी ५० हजार रुपये नेट बँकिंगने त्याच्या बँकअकाऊंटमध्ये ट्रान्सफर केले. त्यानंतर त्याने साडेचार लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर तरुणीने जीवन बीमा नगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. पोलीस आता मुरुगेशच्या शोधात आहेत असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.