चीनमधून करोना साथीमुळे बाहेर पडलेले उद्योग आपल्याकडे वळवल्याने  भारताला फायदाच होईल याची कुठलीही खात्री नाही,असे मत नोबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी यांनी व्यक्त केले आहे.

बंगाली वृत्तवाहिनीला त्यांनी सांगितले,की सर्व जण चीनला करोना विषाणूचा उगम तेथून झाल्याबाबत दोष देत आहेत. चीनमधील उद्योग आता बाहेर पडतील व त्यांना भारताकडे वळवले पाहिजे असा आग्रह केला जात आहे. पण  त्यातून फायदा होईलच याची कुठली खात्री नाही.

पश्चिम बंगाल सरकारने नेमलेल्या जागतिक सल्लागार मंडळाचे बॅनर्जी हे सदस्य असून त्यांनी करोना १९ चा मुकाबला करण्यासाठीचा आराखडा तयार करण्यात राज्य सरकारला मदत केली आहे.

ते म्हणाले, जरी चीनच्या चलनाचे अवमूल्यन झाले तर चिनी वस्तू स्वस्त होतील व लोक त्यांचीच उत्पादने घेणे पसंत करतील. केंद्र सरकारने देशांतर्गत उत्पन्नाचा किती भाग मदत योजनांवर खर्च करावा यावर त्यांनी सांगितले की, अमेरिका, ब्रिटन, जपान यांनी त्यांच्या देशांतर्गत उत्पन्नाचा जास्त भाग मदत योजनांवर खर्च केला आहे. भारताने १.७० लाख कोटी रुपये खर्च करण्याचे ठरवले आहे, पण यापेक्षा जास्त खर्च मदत योजनांवर करायला हवा. गरीब लोकांकडे पैसा नाही, त्यांची क्रयशक्ती कमी झालेली आहे.

बाजारात वस्तूंना मागणी नाही. लोकांना खर्च करण्यासाठी पैसा असेल तरच अर्थव्यवस्था चालू राहणार नाहे. श्रीमंत लोक अर्थव्यवस्था चालवत नसतात तर गरीब लोक ती चालवतात. त्यामुळे गरिबांना टप्प्याटप्प्याने पैसा दिला पाहिजे. त्यासाठी तीन ते सहा महिन्यांची मुदत ठरवून घ्यावी. गरिबांनी त्यांना दिलेले पैसे खर्च केले नाहीत तरी त्यात  कुठला प्रश्न नाही.

स्थलांतरित कामगारांची काळजी घेण्याची गरज आहे. त्यांच्या प्रश्नांचा आपण विचारही केलेला नाही. त्यांना निवारा नाही, पैसा नाही. त्यामुळे तातडीच्या शिधापत्रिका जारी करायला हव्यात. तीन ते सहा महिन्यात हे काम करायला हवे. स्थलांतरित मजूर वेगवेगळ्या राज्यातून प्रवास करीत चालले आहेत, त्यामुळे या शिधापत्रिका गरजेच्या आहेत, त्या जारी करण्याची  जबाबदारी केंद्राची आहे.

केंद्र सरकारने लोकांच्या काही कर्जाच्या परतफेडीला स्थगिती दिली आहे. पण अजून उपायांची गरज आहे. दिल्ली व बंगळूरु येथील कामगारांना तेथेच काम देण्याचे सांगून घरी जाण्यास परावृत्त करण्यात आले. सामाजिक अंतर राखून अर्थव्यवस्था कशी चालवणार याचे उत्तर अजून मिळालेले नाही.

भारत हा मोठा देश आहे, तेथे सुरूवातीपासून चाचण्या जास्त करायला हव्या होत्या. लोकसंख्यात्मक चाचण्या करण्यात आलेल्या नाहीत त्यामुळे करोनाचा आवाका अजून लक्षात येणे बाकी आहे. टाळेबंदी उठवण्यापूर्वी या चाचण्या करायला हव्यात. जेवढय़ा चाचण्या जास्त तेवढा मृत्युदर कमी राहील. पश्चिम बंगालमध्ये चाचण्या वाढवल्या आहेत त्यामुळे मृत्युदर कमी होईल. देशातील करोना वाढीबाबत त्यांनी सांगितले,की त्याची वाढ घातांकी नसून रेषीय आहे.