अण्णाद्रमुकमधून हकालपट्टी झालेल्या आणि सध्या तुरुंगात असलेल्या शशिकला यांचे पती एम. नटराजन यांचे मंगळवारी पहाटे निधन झाले. छातीत संसर्ग झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. नटराजन हे ७६ वर्षांचे होते.

एम. नटराजन यांना १६ मार्च रोजी चेन्नईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना छातीत संसर्ग झाला होता. सोमवारी रात्री त्यांची प्रकृती खालावली. मंगळवारी पहाटे दोनच्या सुमारास त्यांचे निधन झाले. रुग्णालयाने पत्रक काढून नटराजन यांच्या निधनाची माहिती दिली. नटराजन यांच्यावर गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये यकृत प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती. यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा देखील झाली होती. मात्र, अवघ्या काही महिन्यांतच त्यांना आजाराने ग्रासले आणि यातच त्यांचे निधन झाले.

नटराजन हे देखील अण्णाद्रमुकच्या दिवंगत नेत्या जयललिता यांचे निकटवर्तीय होते. १९८९ च्या सुमारात तिकीट वाटपात भ्रष्टाचार केल्याचा आरोपही त्यांच्यावर झाला होता. शशिकला यांचे पती ही त्यांची ओळख असले तरी पडद्यामागील सूत्रधारही तेच असल्याची चर्चा नेहमीच केली जायची. सुप्रीम कोर्टाने बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी शशिकला यांना चार वर्षांचा तुरुंगवास सुनावला असून सध्या त्या बंगळुरुमधील तुरुंगात शिक्षा भोगत आहेत.