लोकसभेसाठी पसंतीच्या मतदारसंघातून उमेदवारी न दिल्यामुळे नाराज होऊन पक्ष सोडणारे बंडखोर भाजप नेते जसवंत सिंह यांनी लालकृष्ण अडवाणींच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यामुळे जसवंत सिंह भाजपमध्ये परतणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे.  जसवंत सिंह यांनी लोकसभा निवडणुकीत बाडमेर मतदारसंघातून भाजपचे अधिकृत उमेदवार कर्नल सोनाराम यांना आव्हान दिले होते. मात्र, या निवडणुकीत कर्नल सोनाराम यांनी ८७,४६१ इतक्या मताधिक्याने जसवंत सिंहांचा पराभव केला होता.  लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतल्यानंतर जसवंत यांना भाजपमध्ये पुन्हा सामावून घेतले जाणार की नाही अशा चर्चा रंगण्यास सुरूवात झाली आहे. मात्र, लालकृष्ण अडवाणी आणि जसवंत सिंह यांच्यातील भेटीचा कोणताही राजकीय उद्देश नसल्याची माहिती अडवाणींच्या निकटवर्तीयांनी दिली. जसवंत सिंह यांच्याबरोबर राजस्थान विधासभेत आमदार असणारे त्यांचे पूत्र मानवेंद्र सिंह यांचीसुद्धा पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यामुळे शुक्रवारच्या भेटीदरम्यान मानवेंद्र सिंह यांच्या आगामी काळातील भवितव्याविषयी जसवंत सिंह यांनी लालकृष्ण अडवाणींशी चर्चा केल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.