देशातील अनेक राज्यांमध्ये करोनाचा संसर्ग वाढत असल्याच्या पाश्र्वभूमीवर करोना लशींची देशातील मागणीच पुरवण्यावर भारत भर देणार असून; येत्या काही महिन्यांसाठी या लशींची निर्यात केली जाणार नाही, असे या घडामोडींशी संबंधित असलेल्या सूत्रांनी बुधवारी सांगितले.

तथापि, या लशींची व्यावसायिक कंत्राटे आणि निर्यातीबाबतची बांधिलकी यांचे पालन केले जाईल आणि या महासाथीला तोंड देण्यासाठी जगभरातील देशांना मदत करणे भारत सुरूच ठेवेल, असेही त्यांनी सांगितले.

भारताने आतापर्यंत ८० देशांना करोना लशींच्या ६ कोटी ४ लाख मात्रांचा पुरवठा केला आहे. या एकूण पुरवठ्यात अनुदानाच्या स्वरूपातील मदत म्हणून पाठवलेल्या मात्रा आणि व्यावसायिक करारान्वये पाठवलेल्या मात्रा यांचा समावेश आहे.

निरनिराळ्या देशांना लस पुरवण्याबाबत घेतलेली जबाबदारी भारत पूर्ण करेल, मात्र निर्यात देशांतर्गत मागणीवर अवलंबून राहील, असेही या लोकांनी सांगितले.

‘येते काही महिने निर्यातीचे प्रमाण वाढवले जाणार नाही. सध्या लशीचे उत्पादन वाढवण्यावर आम्ही भर देत असून, सुमारे २-३ महिन्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला जाईल,’ अशीही माहिती संबंधितांनी दिली.

भारताने गेल्या २० जानेवारीला विदेशी राष्ट्रांना लशीच्या मात्रा पुरवण्यास सुरुवात केली. सुरुवातीला शेजारी देशांना अशा प्रकारे लसीचा पुरवठा करण्यात आला.

४५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांचे १ एप्रिलपासून लसीकरण केले जाईल, असे सरकारने यापूर्वीच जाहीर केले आहे. अनेक राज्यांमध्ये करोना संसर्गाची प्रकरणे वाढल्यामुळे देशव्यापी लसीकरण मोहीम आणखी व्यापक करण्यात येणार आहे.

७७ देशांना ६०५ लाख कुप्यांची निर्यात

भारतातून गुरुवारपर्यंत ७७ देशांना ६०५ लाख कुप्या निर्यात केल्या आहेत. सर्वाधिक ९० लाख कुप्या बांग्लादेशला निर्यात केल्या असून त्या खालोखाल मोरोक्को (७० लाख), ब्रिटन (५० लाख), नायजेरिया (३९ लाख), सौदी अरेबिया (३० लाख), नेपाळ (२३ लाख) व इथोपिया (२१ लाख) देशाला पुरवठा केला आहे.