28 February 2021

News Flash

हिंदी महासागरात चीनवर वचक ठेवणार भारताचा ‘टायगर’

शत्रूच्या विमानवाहू युद्ध नौकांना दूर अंतरावरुन तसेच महत्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करण्याची क्षमता भारताला प्राप्त झाली आहे.

बंगालची खाडी आणि हिंदी महासागर क्षेत्राचा भाग भारतासाठी रणनितीक दृष्टीकोनातून अत्यंत महत्वाचा आहे. अलीकडच्या काळात या भागात चिनी नौदलाच्या हालचाली मोठया प्रमाणात वाढल्या आहेत. चीनच्या या वाढत्या आव्हानाचा सामना करण्यासाठी भारताकडे आता घातक शस्त्रास्त्रे उपलब्ध आहेत. शत्रूच्या विमानवाहू युद्ध नौकांना दूर अंतरावरुन तसेच महत्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करण्याची क्षमता भारताला प्राप्त झाली आहे.

सुखोईवर काय जबाबदारी असेल?
रात्रीच्यावेळी किंवा कुठल्याही वातावरणात शत्रूवर अत्यंत अचूकतेने प्रहार करता येईल. तामिळनाडूतील तंजावर एअर बेसवर इंडियन एअर फोर्स सुपसॉनिक ब्रह्मोस क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असलेली सुखोई-३० एमकेआयची स्क्वाड्रन तैनात करणार आहे. सुखोई-३० हे खास नौदलासाठी विकसित केलेले विमान नाही. पण या फायटर जेटवर समुद्रातील टार्गेटसना लक्ष्य करण्याची जबाबदारी असेल.

ब्रह्मोसमुळे सुखोईची हल्ला करण्याची क्षमत कैकपटीने वाढली आहे असे एअर फोर्स प्रमुख राकेश कुमार सिंह भदौरिया यांनी सांगितले. सुखोई आणि ब्रह्मोस एकत्र आल्यामुळे एअर फोर्सला दूर अंतरावरुनच समुद्र किंवा जमिनीवरील कुठल्याही लक्ष्यावर अचूक प्रहार करण्याची क्षमता प्राप्त करुन देण्याचे आमचे स्वप्न पूर्ण झाले आहे असे ब्रह्मोस प्रकल्पाचे महासंचालक सुधीर मिश्रा म्हणाले.

काय आहे टायगर शार्क?
सुखोईच्या या स्क्वाड्रनला ‘टायगर शार्क’ नाव देण्यात आले आहे. सोमवारी तैनात होणाऱ्या या स्क्वाड्रनमध्ये सुरुवातीला चार ते सहा विमाने असतील. वर्षअखेरीस १८ विमानांचा संपूर्ण ताफा कार्यरत होईल. एअर फोर्सच्या एका स्क्वाड्रनमध्ये अठरा फायटर विमाने असतात. सुखोईच्या या स्क्वाड्रनकडे १५०० किलोमीटरच्या पट्ट्याची जबाबदारी असेल.
सुखोईवर बसवण्यात आलेल्या ब्रह्मोसची रेंज २९० किलोमीटर आहे. सुखोई हे चौथ्या पिढीचे फायटर विमान असून टायगर शार्क ही १२ वी स्क्वाड्रन आहे. दक्षिण भारतात प्रथमच सुखोई स्क्वाड्रन तैनात होत आहे. याआधीच्या ११ स्क्वाड्रन पूर्व आणि पश्चिम सीमेवर तैनात करण्यात आल्या आहेत. हलवारा, पुणे, जोधपूर, सिरसा, बरेली, तेजपूर आणि चाबुआ येथे सुखोईच्या स्क्वाड्रन तैनात आहेत.

तंजावूरमध्ये सुखोई का तैनात केली?
हिंदी महासागर क्षेत्रात चीनच्या हालचाली मोठया प्रमाणात वाढल्या आहेत. रणनितीक दृष्टीने हा भाग भारतासाठी अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे त्याला उत्तर म्हणून सुखोई तैनातीचा निर्णय घेण्यात आला आहे. आफ्रिकेतील दिजीबाऊटी येथे चीनचा परदेशातील पहिला लष्करी तळ २०१७ मध्येच सुरु झाला आहे. कराची बंदरात सुद्धा चिनी नौदलाचा वावर आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 20, 2020 2:45 pm

Web Title: eye on china south gets first sukhoi squad with brahmos dmp 82
Next Stories
1 जे.पी. नड्डा भाजपाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष
2 काश्मीरमध्ये सुरक्षा दलांकडून तीन दहशतवाद्यांचा खात्मा
3 …आणि नरेंद्र मोदींनी काढली अनिल कुंबळेच्या ‘त्या’ ऐतिहासिक खेळीची आठवण
Just Now!
X