सोशल मीडियातील सध्याची आघाडीची वेबसाईट फेसबुकचे सीईओ मार्क झकरबर्ग पुढील आठवड्यात मंगळवारी लाईव्ह प्रश्नोत्तराच्या माध्यमातून नेटिझन्सच्या प्रश्नांना उत्तरे देणार आहेत. अशा पद्धतीने लाईव्ह प्रश्नोत्तराच्या माध्यमातून जगभरातील नेटिझन्सना एकत्र जोडण्याचा हा फेसबुकचा पहिलाच प्रयत्न आहे.
मंगळवारी, १४ जून रोजी पॅसिफिक प्रमाणवेळेनुसार सकाळी ११.३० वाजता (भारतीय प्रमाणवेळेनुसार मंगळवारी रात्री १२ वाजता) हा लाईव्ह प्रश्नोत्तराचा कार्यक्रम होईल. या संदर्भात स्वतः झकरबर्ग यांनी लिहिले आहे की, जेव्हा मी जगभरात फिरतो. त्यावेळी वेगवेगळ्या ठिकाणी टाऊन हॉलच्या माध्यमातून लोकांच्या प्रश्नांना उत्तरे द्यायला मला आवडते. फेसबुकच्या मुख्यालयातही आम्ही काही प्रश्नोत्तराचे कार्यक्रम केले आहेत. आता लाईव्ह प्रश्नोत्तरामुळे मला वेगवेगळ्या भागातील नेटिझन्सना ऐकायला मिळेल. संवादात्मक पद्धतीने हा कार्यक्रम होईल. तुमच्या आवडीच्या सर्व विषयांना हात घालण्याचा या कार्यक्रमामध्ये आम्ही प्रयत्न करू.
प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी काय करायचे?
या कार्यक्रमासंबंधी मार्क झकरबर्गच्या फेसबुक पोस्टवर नेटिझन्सनी आपले प्रश्न विचारायचे आहेत. ज्या प्रश्नांना सर्वाधिक लाईक्स मिळतील. त्या प्रश्नांची निवड होण्याची शक्यता अधिक आहे. या पोस्टवर विचारण्यात आलेल्या जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरे देण्याचा आम्ही प्रयत्न करू, असे झकेरबर्ग यांनी म्हटले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 9, 2016 10:56 am