चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती कुणी कारखानदार, उद्योगपती नसून, मोबाइल टचस्क्रीनचा वेगवेगळय़ा कंपन्यांना पुरवठा करणारी एक महिला आहे. तिचे नाव झाऊ क्यूनफे. अ‍ॅपल, सॅमसंग यांसारख्या नामांकित कंपन्यांना ती मोबाइलसाठी टचस्क्रीन पुरवते. तिला क्वीन ऑफ मोबाइल फोन ग्लास असेच म्हटले जाते. याअगोदर चीनमधील सर्वात श्रीमंत महिला चॅन लायवा या होत्या. त्या बीजिंग रेड सँडलवूड कल्चरल फाऊंडेशनच्या संस्थापक आहेत. त्यांची मालमत्ता ६.१ अब्ज डॉलर आहे. फोर्ब्सची अब्जाधीशांची जी यादी जाहीर झाली आहे त्यात ही माहिती देण्यात आली आहे. झाऊ यांच्या लेन्स टेक्नॉलॉजी या आस्थापनेच्या शेअरची किमत काल ७८.०८ युआन झाली. दहा दिवसांतील ही सर्वाधिक वाढ होती. शेनझान येथील ग्रोथ एन्टरप्राइज मार्केट बोर्डवर त्यांच्या कंपनीची नोंदणी असून १८ मार्चला त्यांचा शेअर २२.९९ युआनला होता. आज सकाळी लेन्स टेक्नॉलॉजीचा शेअर वधारला. अकराव्या दिवशी तो ८५.८९ युआन झाला, त्यामुळे झाऊ क्यूनफे या चीनमधील सर्वात श्रीमंत महिला ठरल्या आहेत.
लेन्स टेक्नॉलॉजी ही त्यांची कंपनी ग्राहकोपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तू म्हणजे स्मार्टफोन, संगणक व कॅमेरे यासाठी काचा तयार करते. या कंपनीच्या काचांसाठी अ‍ॅपल, सॅमसंग या कंपन्यांकडून त्यांना २०१४ मध्ये ९ अब्ज डॉलर मिळाले होते व महसुलातील सत्तर टक्के वाटा अ‍ॅपल व सॅमसंगचा आहे. झाऊ यांचे आयुष्य फार वेगळे आहे. त्यांचा जन्म मध्य चीनमधील हनान प्रांतात १९७० मध्ये झाला. त्यांनी सुरुवातीला शेनझान शहरात घडय़ाळाच्या काचा तयार करण्याच्या कारखान्यात काम सुरू केले. २००३ मध्ये त्यांनी स्वत:ची कंपनी स्थापन केली. या कंपनीचे मुख्यालय हनान येथे आहे. आता या कंपनीच्या दहा उपकंपन्या असून त्या चीनमध्ये वेगवेगळय़ा ठिकाणी आहेत. त्यात ६० हजार लोक काम करतात. त्यांनी एकदा पत्रकारांना सांगितले होते, की कठोर मेहनत व चिकाटी यामुळे आपण हे यश मिळवू शकलो. शेअर बाजारात कंपनीची कामगिरी चांगली असली तरी नंतर ही कंपनी नफा टिकवू शकेल असे वाटत नाही असे बाजारपेठ तज्ज्ञांचे मत आहे. २०१२ मध्ये कंपनीला २ अब्ज युआनचा नफा झाला होता. नंतर तो २०१४ मध्ये १.१७ अब्ज युआन झाला.
लेन्स टेक्नॉलॉजी ही कंपनी अ‍ॅपल व सॅमसंग या मोठय़ा ग्राहकांवर अवलंबून आहे व त्या दोन कंपन्यांचाच महसुलातील वाटा ७० टक्के आहे. नव्या अ‍ॅपल वॉचसाठीच्या काचाही याच कंपनीने पुरवल्या आहेत.